गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा करा, प्रशासनाचे जनतेला आवाहन

By आनंद डेकाटे | Published: September 6, 2023 04:35 PM2023-09-06T16:35:00+5:302023-09-06T16:40:13+5:30

पोलीस, स्थानिक प्रशासनाची गणेश मंडळांसोबत बैठक  

Celebrate Ganesha festival with peace and enthusiasm, administration appeals to the public | गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा करा, प्रशासनाचे जनतेला आवाहन

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा करा, प्रशासनाचे जनतेला आवाहन

googlenewsNext

नागपूर : पर्यावरणपूरक,शिस्तीत व उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जनतेने यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन बुधवारी पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले. महापालिकेकडून गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन परवानगी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच, विसर्जनस्थळी मूर्ती स्वीकार केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर शहर व जिल्ह्यामध्ये यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तरित्या येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात गणेशमंडळ आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित केली. यावेळी ही माहिती देण्यात आली व सूचना करण्यात आल्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्यासह पोलीस, मनपा व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवा दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण न होता कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. गणेश मंडळांनी वर्गणीसाठी नागरिकांना जबरदस्ती करु नये, पावसाची स्थिती पाहता गणेश मंडळांनी शॉर्ट सर्कीट होणार नाही याची दक्षता घ्यावी, सीसीटिव्ही लावावेत,आपत्तीजनक देखावे उभारु नये आदी सूचना दिल्या. ‘गणेश विसर्जन’ आणि ‘ईद’ उत्सव हे २८ सप्टेंबर रोजी साजरे होणार आहेत, हे लक्षात घेता सामाजिक सौहार्द राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

- मनपाकडून मूर्ती स्वीकार केंद्र

मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमुर्त्यांची स्थापना व्हावी तसेच विसर्जनासाठी होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी मनपातर्फे झोनस्तरावर मूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिली. या केंद्रांवर गणेश मुर्त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन मिरवणुकीप्रसंगी नागरिकांनी स्वयं शिस्त पाळावी, असेही त्यांनी सांगितले. 

- गणशे मंडळांना ऑनलाईन परवानग्या

महानगरपालिकेने प्रथमच गणेश मंडळांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी व या कार्यपध्दतीत सुसूत्रता आणण्याकरिता ऑनलाईन परवनगी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मनपाने पोर्टलद्वारे ऑनलाईन परवानगी सुविधा उपलब्ध करुन दिल्याने ४८ तासात संबंधीत विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होऊन अंतिम परवानगी देण्यात येणार आहे. गणेश मंडळांना मनपातर्फे आकारण्यात येणारे विविध शुल्क माफ करण्यात आले असून सफाई व प्रवेशद्वार शुल्कच मंडळांना द्यावे लागेल.

-  उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन

राज्यात देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. राज्यातून पहिल्या तीन पुरस्कारांमध्ये नागपूर जिल्ह्यातील गणेश मंडळ पुरस्कार पटकावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Celebrate Ganesha festival with peace and enthusiasm, administration appeals to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.