युद्धातील वीरांचा सन्मान करून होळी साजरी
By admin | Published: March 27, 2016 02:52 AM2016-03-27T02:52:07+5:302016-03-27T02:52:07+5:30
१९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या युद्धातील वीरांचा सन्मान करून तसेच कुठल्याही झाडाला न कापता सुका कचरा गोळा करून होळीचे दहन करण्यात आले.
गोपाल बोहरेंचा उपक्रम : सुका कचरा गोळा करून होळी दहन
नागपूर : १९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या युद्धातील वीरांचा सन्मान करून तसेच कुठल्याही झाडाला न कापता सुका कचरा गोळा करून होळीचे दहन करण्यात आले. अशाप्रकारची आगळीवेगळी होळी मागील नऊ वर्षांपासून अत्रे लेआऊट येथील एनआयटी कॉलनीत नगरसेवक गोपाल बोहरे यांच्यातर्फे साजरी करण्यात येत आहे.
नगरसेवक गोपाल बोहरे यांनी होलिकापूजन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, अविनाश महालक्ष्मे यांच्या हस्ते डॉ. वसंत विनायक तत्त्ववादी, प्रकाश खरे, वसंत हरी दामले, प्रभाकर पुराणिक, कृष्णा विष्णू हाडके यांना शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. वसंत तत्त्ववादी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १९६२ च्या युद्धात चीनकडून पराभूत झाल्यानंतर डॉक्टरांनी लष्करात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला दाद देत मी लष्करात रजपूत बटालियन्समध्ये डॉक्टर म्हणून रुजू झालो. १९६५ च्या युद्धात आमची बटालियन लाहोरपर्यंत पोहोचली होती.
युद्ध जिंकल्यानंतर तब्बल सहा महिने भारतीय सेना पाकिस्तानात होती, त्यामुळे १९६६ सालची होळी पाकिस्तानात साजरी केल्याची आठवण त्यांनी सांगितली. प्रास्ताविक गोपाल बोहरे यांनी केले. प्रा. प्राची भेदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी प्रशांत बुजवणे, किरण देशमुख, अण्णा जातेगावकर, विजित आगलावे, राजकुमार टेकाडे, प्रणव बोहरे, दिशा पाटील, हिरण्य भागवत, आशिष कर्णेवार, चिन्मयी कावळे, आर्या टेकाडे, मयुरी भालेराव, प्राची भेदे आणि संपूर्ण साहस गणेश मंडळाने परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)