‘सीआरसी’ केंद्रात महिलादिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:33+5:302021-03-10T04:10:33+5:30
नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘सीआरसी’ केंद्राच्या मानसशास्त्र विभागातर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस ...
नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘सीआरसी’ केंद्राच्या मानसशास्त्र विभागातर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या हस्ते दिव्यांग बालकांच्या मातांचा सन्मान करण्यात आला. मानवजातीच्या विकासात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा वाटा आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय यासारख्या सर्वच क्षेत्रामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क व दर्जा प्रदान करून देणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून दिव्यांग बालकांच्या मातांना शिक्षण-प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन संचालक प्रफुल्ल शिंदे यांनी केले. यावेळी दिव्यांग बालकांच्या मातांकरिता विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करून प्रेरणादायी भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख अपर्णा भालेराव-पिंपळकर यांनी तर डॉ. अश्विनी डहाट यांनी आभार मानले. अबोली जारिट यांनी सूत्रसंचालन केले.