भावपूर्ण सत्काराने रंगलेला सोहळा

By admin | Published: December 28, 2014 12:38 AM2014-12-28T00:38:14+5:302014-12-28T00:38:14+5:30

मैत्री परिवार सातत्याने समाजासाठी काम करणारी संस्था आहे. समाजासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे कामही संस्था गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे.

The celebrated colorful ceremony | भावपूर्ण सत्काराने रंगलेला सोहळा

भावपूर्ण सत्काराने रंगलेला सोहळा

Next

मैत्री परिवार संस्था : सचिन बुरघाटे यांना मैत्री गौरव पुरस्कार प्रदान
नागपूर : मैत्री परिवार सातत्याने समाजासाठी काम करणारी संस्था आहे. समाजासाठी स्वत:ला झोकून देणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे कामही संस्था गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. मैत्री गौरव पुरस्कार समारंभात आज अकोल्याच्या अ‍ॅस्पायर संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे यांना मैत्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना बुरघाटे यांना भरून आले आणि त्यांच्या संघर्षाचा प्रवासही यानिमित्ताने समोर आला. याप्रसंगी सारे वातावरण भावपूर्णतेने व्यापले.
मैत्री परिवार संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी आचार्य हरिभाऊ वेळेकर तर प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. श्रीरामपंत जोशी, शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणाऱ्या मिथुन (बबलु) चौधरी, मैत्री परिवाराचे प्रा. संजय भेंडे, प्रा. प्रमोद पेंडके, अनिल बोबडे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, प्रा. विजय शहाकार, जगदीश गणभोज उपस्थित होते. याप्रसंगी सर्व अतिथींचा सत्कार करण्यात आला. अकोल्याचे सचिन बुरघाटे यांनी विपरीत स्थितीत स्वत:चे शिक्षण मराठी माध्यमात पूर्ण केले. पण इंग्रजीशिवाय स्पर्धेत टिकाव लागत नाही, हे ओळखून त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. दरम्यानच्या काळात पुण्यातून एमबीए केले आणि एका बँकेत नोकरीही लागली. पण गावाकडल्या विद्यार्थ्यांची प्रगती व्हायला हवी. त्यासाठी त्यांना इंग्रजी आले पाहिजे आणि या भाषेविषयीची भीती दूर झाली पाहिजे, या ध्येयाने त्यांना झपाटले. नोकरी सोडून ते परतले आणि अकोल्यात अ‍ॅस्पायर ही संस्था निर्माण केली. सध्या लाखो विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्थेतून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले आहे. एक आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर आणि इंग्रजीचे प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा मैत्री गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
सत्काराला उत्तर देताना सचिन बुरघाटे हळवे झाले. आईवडिल अल्पशिक्षितच होते. इयत्ता सातवीपर्यंत मी चप्पलही घातली नाही, पदवीचे शिक्षण मराठीतच झाले. पण केवळ आत्मविश्वासाच्या अभावी विद्यार्थी मागे पडतात आणि इंग्रजीला घाबरतात, हे लक्षात आले. मनोरंजनाच्या क्षेत्रात मला भविष्य घडविता आले असते पण मी अ‍ॅस्पायर संस्था स्थापन केली. माझ्या विद्यार्थ्यांना स्वाभिमान दिला. विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व येत असल्याचे पाहून माझा हुरूप वाढला आणि कामही वाढले. प्रत्येकातच गुण असतात, विचार असतात पण आत्मविश्वास नसतो. मी हा विश्वास जागविण्याचे काम करतो आणि विद्यार्थी इंग्रजी शिकतात. गेल्या १५ वर्षापूर्वी मी सामान्यच होतो पण दरम्यानच्या काळात अनुभवांनी खूप शिकविले. हा माझ्या आयुष्यातील मोठा सत्कार आहे आणि यामुळे जबाबदारी वाढली, असे ते म्हणाले.
श्रीरामपंत जोशी म्हणाले, परिस्थिती माणसाला घडविते. आपल्या आयुष्यातील अनुभवच आपल्याला शिकवित असतात. बुरघाटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली, हे मोठे काम आहे. मैत्री परिवारानेही मोठे काम उभारून समाजाचे ऋण फेडण्याचे व्रत स्वीकारले. हे कार्य सातत्याने वाढत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात.
आचार्य हरिभाऊ वेरुळकर म्हणाले, बुरघाटे यांनी स्वत:ला घडवितानाच इतरांचाही विचार केला. नकारात्मकता ओलांडण्याची आपली क्षमताच आपल्याला मोठे करीत असते, हे बुरघाटे यांनी सिद्ध केले. केवळ शिक्षणच महत्त्वाचे नाही तर संस्कार त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. संस्कार आणि शिक्षणाच्या समन्वयातूनच निकोप समाजनिर्मिती होते, असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिलीत. १ हजार यज्ञाने मिळणारे पुण्य मैत्री परिवार एका कार्यातून मिळवित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संस्थेने मानवधर्माचीच पताका हाती घेतली आहे, त्याचा प्रसार भविष्यात होतच राहो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकातून प्रमोद पेंडके यांनी संस्थेचा उद्देश आणि कार्य सांगितले. संचालन माधुरी यावलकर तर आभार संजय भेंडे यांनी मानले. याप्रसंगी संस्थेच्या संकेतस्थळाचे आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)
संगीताचा कार्यक्रम
सत्कार समारंभानंतर गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रसन्न जोशी आणि साक्षी सरोदे यांनी गीत, गझल सादर केले. त्यांना नासिर खान, नीलेश खोडे, रााहुल मानेकर, निशिकांत यांनी वाद्यांवर साथ दिली.
पुरस्काराची रक्कम दान
सचिन बुरघाटे यांना पुरस्कारापोटी २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. पण त्यांनी हा निधी वंदेमातरम ग्रुप आणि स्वामी विवेकानंद स्वयंसेवी संस्थेला प्रदान करण्याचा निर्णय जाहीर केला. दोन्ही संस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी आणि उर्वरित एक हजार रुपये आईच्या साडीसाठी ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनीच कौतुक केले.

Web Title: The celebrated colorful ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.