भाऊ ‘ईथे’ येत नाही, त्यांनी एकमेकींनाच बांधली राखी

By निशांत वानखेडे | Published: August 30, 2023 05:19 PM2023-08-30T17:19:18+5:302023-08-30T17:23:26+5:30

वारांगणांच्या वस्तीत रक्षाबंधन साजरा : ज्वाला धाेटेंनी राखली वडिलांची परंपरा

Celebrating Raksha Bandhan in Ganga-Jamuna red light area of Nagpur | भाऊ ‘ईथे’ येत नाही, त्यांनी एकमेकींनाच बांधली राखी

भाऊ ‘ईथे’ येत नाही, त्यांनी एकमेकींनाच बांधली राखी

googlenewsNext

नागपूर : शरीरविक्रय करणाऱ्या वारांगणांच्या वस्तीत रक्षाबंधनाचा सण साजरा हाेणे अशक्यच आणि दुर्मिळ गाेष्ट आहे. मात्र नागपूरमधली गंगा-जमुना वस्ती याला अपवाद आहे. बुधवारी रक्षाबंधणाचा सण या वस्तीत उत्साहात साजरा झाला. भाऊ ईथे येत नाही, त्यांनी एकमेकींनाच राखी बांधून आनंद साजरा केला. खरेतर ही त्यांची परंपरा झाली आहे, जी त्यांच्या एका पाठीराख्या भावाने सुरू केली हाेती.

वारांगणांना आपली बहीण मानण्यास क्वचितच कुणी धजावेल. सख्खा भाऊसुद्धा येऊन राखी बांधण्यास तयार हाेणार नाही. मात्र ‘विदर्भवीर’ म्हणून ओळख पावलेले जांबुवंतराव धाेटे यांनी अतिशय खंबीरपणे गंगा-जमुना वस्तीतील महिलांच्या अधिकारांच्या रक्षणाची शपथ घेत स्वत:ला त्यांचा भाऊ म्हणून येथे रक्षाबंधनाची परंपरा सुरू केली हाेती. त्यांनी सलग ५० वर्षे येथील महिलांकडून स्वत:च्या मनगटावर राखी बांधून घेतली हाेती. २०१७ साली जांबुवंतराव यांचे निधन झाले. त्यांचा रक्षणकर्ता भाऊ आता राहिला नाही. मात्र त्यांची कन्या ज्वाला धाेटे यांनी पुढाकार घेत तीन वर्षापासून वडिलांची परंपरा चालविली आहे. त्यांच्या पुढाकारानेच बुधवारी येथे रक्षाबंधनाचा उत्साह साजरा झाला. ज्वाला धाेटे यांनी भाऊ म्हणून या महिलांकडून राखी बांधून घेतली.

भावाच्या मनगटावर राखी बांधावी, त्याचे औक्षवण करावं, असे येथील वारांगणांना मनाेमन वाटते. शहरात आज सर्वत्र रक्षाबंधनानिमित्त उत्साहाचे वातावरण असताना गंगा-जमुना वस्ती मात्र ओसाड पडली आहे. समाजाने तिरस्कार करून वाळीत टाकले आणि या महिलांचे भाऊदेखील इकडे फिरकत नाही. स्वत:च्या कुटुंबाने पाठ फिरवली, हक्काची नाती परकी झाली, असताना त्यांची काय भावना हाेत असेल, हा विचारच केलेला बरा. मात्र जांबुवंतराव धाेटे यांनी सुरू केलेल्या परंपरेतून किमान भाऊ-बहिणीच्या उत्सवाचा दिलासा या महिलांना मिळत आहे.

Web Title: Celebrating Raksha Bandhan in Ganga-Jamuna red light area of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.