संघाची शताब्दी साजरी करणे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय
By योगेश पांडे | Updated: April 18, 2024 22:57 IST2024-04-18T22:57:32+5:302024-04-18T22:57:44+5:30
मोहन भागवत : देशात आत्मविस्मृतीमुळे आपले कोण याबाबतीत ज्ञानाचा अभाव

संघाची शताब्दी साजरी करणे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शताब्दी वर्षाची तयारी सुरू असताना सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मात्र वेगळेच वक्तव्य केले आहे. संघाची शताब्दी साजरी करावी लागते आहे हा आमच्या चिंतेचा विषय आजही आहे. शताब्दी साजरी वगैरे करायची नाही असे काही लोकदेखील म्हणतात .कुण्या एका संस्थेचे अहंकाराचा पोषण करण्यासाठी संघ नाही. आम्ही हे काम केले, ते काम केले सांगण्यासाठी संघ स्थापन झालेला नाही, असे विचार सरसंघचालकांनी मांडले. नागपुरात साप्ताहिक विवेकच्या संघावरील ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. आपल्या देशातील मागील काही शतकांचा इतिहास आहे की बाहेरून कुणी येतो व गुलाम बनवतो. मात्र संघर्ष करून स्वतंत्र झाल्यावर आपण काही चुका करत परत गुलामगिरीत जातो. आपले भेद परकीयांच्या यशाला खतपाणी घालतात. हा मोठा रोगच आहे. याचे निदान झाल्याशिवाय देशाचे नष्टचर्य संपणार नाही. आपल्या देशात आत्मविस्मृतीमुळे आपले कोण याबाबतीत ज्ञानाचा अभाव आहे. मानसिक गुलामगिरीमुळे आत्मविश्वास नाही .त्यामुळे स्वार्थ आणि भेदांचे थैमान आहे. ओळख आपल्या मनात स्पष्टपणे जागली पाहिजे, असेदेखील सरसंघचालक म्हणाले.
मुळात संघ कुठल्या भौतिक साधनांवर नव्हे तर लोकांच्या जीवनावर चालतो. संघाचा प्रवासाचे चित्रण लहान ग्रंथात होणे कठीण आहे. संघाबाबत लिहीणे वाढत राहणार. अगदी देशविदेशातील जाणकार लोकांना संघ महत्त्वाचा घटक वाटतो व तो समजायला हवा असे ते मानतात. संघ केवळ बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट नाही. १९२५ साली कुठल्याही साधनाशिवाय संघाची सुरुवात झाली. सुरुवातीला अनेकांना त्रास अडचणी सहन कराव्या लागल्या. आज अनुकूलता आहे. संघाचा प्रवास खडतर संघर्षातून झाला आहे. स्थितीचा उतारचढाव काहीही असला तरी त्याला तोंड देत समोर जाणारी संघटना कायम असते. संघाच्या स्वयंसेवकांनी काय केले यापेक्षा ते कसे असावेत यावर संघ भर देतो, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. अश्विनी मयेकर यांनी संचालन केले.