रेल्वेकडून 'विश्व धरोहर दिवस' साजरा; रेल्वेस्थानक ऐतिहासिक कोच, इंजिनवर रोषणाई
By नरेश डोंगरे | Published: April 18, 2023 10:58 PM2023-04-18T22:58:56+5:302023-04-18T22:59:05+5:30
विविध उपक्रमांचेही आयोजन, आंतरराष्ट्रीय परिषदेकडून निश्चित करण्यात आल्यापासून १८ एप्रिल हा दिवस दरवर्षी भारतीय रेल्वेकडून 'विश्व धरोहर दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून आज १८ एप्रिलला 'विश्व धरोहर दिवस' साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेकडून निश्चित करण्यात आल्यापासून १८ एप्रिल हा दिवस दरवर्षी भारतीय रेल्वेकडून 'विश्व धरोहर दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार, रेल्वेची वास्तू आणि ऐतिहासिक कोच तसेच वाफेवर चालणाऱ्या इंजिनवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी करण्यात आलेल्या विविध योजनांना उजाळा देण्याच्या उद्देशाने हा दिवस १९८२ ला निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार, नागपूर विभागातील नागपूरसह चार ठिकाणांना मानांकित करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे आहेत.
नागपूर रेल्वेस्थानक : ग्रेट इंडियन पेनिनसुला कंपनीकडून या ऐतिहासिक वास्तूची निर्मिती करण्यात आली होती. १५ जानेवारी १९२५ ला तत्कालिन महामहिम सर फ्रँक जी. स्ली. (मध्य प्रांताचे गव्हर्नर) यांनी नागपूर रेल्वेस्थानकाचे उद्घाटन केले होते. सोनेरी (साओनेर) दगड आणि रेतीचा वापर करून ही आकर्षक तसेच भव्य इमारत उभारण्यात आली होती.
स्टीम लोको 'बुलंद'
१९५४ ला मेसर्स स्मिथ विल्सन एन्ड कंपनी लिमिटेड इंग्लंडने नेरोगॅज स्टीम (वाफेवर चालणारे) इंजन -५ झेडपी 'बुलंद'ची नागपूर रेल्वेसाठी निर्मिती केली होती. हे इंजिन पुलगांव - आर्वी (जि. वर्धा) रेल्वे मार्गावर १९८६ पर्यंत कार्यरत होते. नंतर डिझेल इंजिनचा वापर सुरू झाल्याने हे अजनी यार्डात स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर २१ ऑगस्ट २०१२ ला नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात पश्चिमेला हे स्थापित (प्रदर्शन) करण्यात आले. रेल्वे स्थानकवरचे हे एक आकर्षण आहे.
वर्धा रेल्वेस्थानक
एनजी कोच सीआर ९४० : हा नॅरोगेज कोच १९६१ मध्ये तयार करण्यात आला होता. जीईपीआरच्या नियंत्रणात असलेला हा कोच विदर्भातील वर्धा जिल्ह्यात असलेल्या पुलगांव - आर्वी रेल्वे मार्गावर तो १९८८ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत होता. त्यानंतर तो बंद करण्यात आला. हा ऐतिहासिक कोच गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०२१ ला वर्धा रेल्वे स्थानकावर स्थापित करण्यात आला.
चंद्रपूर स्थानकावर 'विराट'चे प्रदर्शन
हिरदागड रेल्वेस्थानकावर एक नॅरोगेज स्टीम इंजिन बंद अवस्थेत पडून होते. १९७३ ला खाणींचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बालाजी मायनिंग कंपनीने हे इंजिन संचालित केले. मात्र, काही दिवसांनंतर त्याचे संचालन बंद केले. नंतर वेकोलिने ते उधार (उसनवार तत्त्वावर) घेतले. त्यानंतर हे वाफेवर चालणारे इंजिन चंद्रपूर स्थानकावर स्थापित करण्यात आले. ते नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरले आहे.