नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष; पदांच्या बेरीज-वजाबाकीचे गणित मांडणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 10:54 PM2022-06-29T22:54:33+5:302022-06-29T22:54:57+5:30
Nagpur News उद्धव ठाकरेे यांनी मुख्यमंत्रपदावरून पदत्यागाची घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये आनंदाचे वातावरण होते. सत्तास्थापनेबाबत स्पष्टता नसताना भाजप कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास शहरातील काही भागांमध्ये जल्लोष केला.
नागपूर : उद्धव ठाकरेे यांनी मुख्यमंत्रपदावरून पदत्यागाची घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये जल्लोषाचे वातावरण होते. ही घोषणा झाल्याच्या अगोदरपासूनच जिल्ह्यातील भाजप आमदारांचे कार्यकर्ते व निकटवर्तीय भाजपची सत्ता स्थापन होणार आणि आपल्याच नेत्याला यावेळी मोठे पद मिळणार असे दावे करत आहेत. दरम्यान, सत्तास्थापनेबाबत स्पष्टता नसताना भाजप कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास शहरातील काही भागांमध्ये जल्लोष केला.
सत्तास्थापनेबाबत भाजपकडून रात्री उशीरापर्यंत कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. राज्यपालांचे निर्देश व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची घोषणा केल्यानंतर आता भाजप सत्ता कधी स्थापन करणार याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत.
भाजपच्या मागील सत्ताकाळात जिल्ह्यातून देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उर्जा मंत्रालयाची धुरा होती. त्यावेळी कृष्णा खोपडे यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. यावेळी मात्र त्यांना संधी देण्यात येईल, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. बावनकुळे यांचे समर्थक कार्यकर्ते त्यांना परत उर्जामंत्री हेच पद मिळणार असल्याचा दावा करत आहेत. अद्याप सत्तास्थापनेचे गणित ठरले नसले तरी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मात्र आपल्या नेत्यांबाबत दावे करण्यास सुरुवात केली आहे.
‘सोशल मीडिया’वर ‘मीम्स’चा पाऊस
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची घोषणा केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून ‘सोशल मीडिया’वर विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या. विशेषत: महाविकास आघाडी सरकार व नेत्यांवर टीका करणाऱ्या ‘मीम्स’चा पाऊस पडला. त्यातही शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्याविरोधात टीकेचा जास्त भडीमार दिसून आला.
कार्यकर्त्यांकडून जल्लोष
भाजप कार्यकर्त्यांकडून धरमपेठ परिसरात जल्लोष करण्यात आला. भाजयुमोचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ एकत्रित आले होते व त्यांनी धरमपेठच्या मुख्य रस्त्यावर जल्लोष केला.