नागपुरात गुढीपाडव्याचा जल्लोष; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढीचं पूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 10:31 AM2023-03-22T10:31:14+5:302023-03-22T10:38:21+5:30
पाडव्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन
नागपूर : आज गुढीपाडवा! साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस. यानिमित्त नागपुरात आज शोभायात्रेचं आयोजन करण्यात आल. ढोल ताशांच्या गजरात उत्साहात मिरवणूक निघाली. या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलं. यावेळी मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक-गोडबोले यांचीही विशेष उपस्थिती होती.
शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातंयं. पारंपरिक पोशाख परिधान करून तरुण तरुणी शोभायात्रेत सहभागी झाले. तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीस, मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक-गोडबोले यांनीही शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. राज्याच्या जनतेला त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नववर्षाचा काय नवीन संकल्प असेल यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी 'जनसेवा हा एकच संकल्प' असल्याचे भाव व्यक्त केले. तो कशाप्रकारचा असेल असे विचारले असता जनसेवेचा संकल्प हा जनसेवेचा असतो अशी मिश्किल प्रतिक्रिया देत जनसेवेकरिता जास्तीत जास्त शक्ती ईश्वराने आम्हाला द्यावी, हेच मागणं असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.