नागपुरात शुक्रवारी रंगणार ‘सरपंच अवॉर्ड’चा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:43 PM2018-02-14T13:43:03+5:302018-02-14T13:51:35+5:30
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करणार आहे. शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नागपूर जिल्हा पातळीवरील सोहळा रजवाडा पॅलेस, गांधीसागर तलावाजवळ, महाल, नागपूर येथे होणार आहे.
गावखेड्यांच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अॅवॉर्ड २०१७’ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.
पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या अठरा जिल्ह्यांतून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. जनतेनेही उत्स्फूर्तपणे सरपंचांची नामांकने दाखल केली आहेत.
सदर पुरस्कारांबाबत प्रचंड चुरस व उत्सुकता आहे. सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे.
याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगिण काम करणाऱ्या सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द ईयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत. असे एकूण तेरा पुरस्कार देण्यात येईल. सुरुवातीला जिल्हा पातळीवर हे पुरस्कार दिले जातील. त्यानंतर या विजेत्यांचे राज्य पातळीसाठी नामांकन होईल. त्यातून राज्यातील आदर्श सरपंच ठरतील.
राज्यात कोण आदर्श ठरणार? याची ग्रामीण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे. जिल्हास्तरावरील पुरस्कारांची निवड करण्यासाठी ‘लोकमत’ने समाजातील तज्ज्ञ व्यक्तींचे निरपेक्ष ज्युरी मंडळ स्थापन केले आहे.
या ज्युरींमार्फत प्रत्येक नामांकनाची छाणनी होऊन विजेत्यांवर मोहोर उमटवली जाणार आहे. त्यामुळे विजेते कोण राहणार? हे सोहळ्यातच स्पष्ट होणार आहे. राज्यासाठीही स्वतंत्र्य ज्युरी मंडळ असेल.
जिल्ह्यातून ३१२ नामांकने
या पुरस्कार योजनेत नागपूर जिल्ह्यातून ३१२ नामांकने दाखल झाली. या नामांकनात नामवंत ग्रामपंचायतींसह दुर्गम भागातील सरपंचांंचाही सहभाग आहे. यानिमित्ताने अनेक गावांच्या यशोगाथाही समोर येणार आहेत.
लोकमत माध्यम नेहमी अभिनव तसेच आकांक्षात्मक संकल्पना राबविण्यात पुढाकार घेत आहे. महाराष्ट्रातील धोरणकर्ते, लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर कार्यक्रमातील सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व ते तळागाळात जे हिमतीने काम करतात, अशा सर्वस्तरापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत़ ग्राम पातळीवर ज्यांनी उल्लेखनीय, दिशादर्शक काम केले आहे, अशा सरपंचांना गौरविताना आनंद होत आहे़ एक जबाबदार माध्यम म्हणून लोकमत नेहमीच आपले कर्तव्य बजावत आहे.
-विजय दर्डा, चेअरमन,
एडिटोरियल बोर्ड, लोकमत
समूहभारतीय ट्रॅक्टर उद्योगात निर्विवाद नेता म्हणून आम्ही नेहमी कृषी उत्पादकता आणि ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित केले़ ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले़ शेतकऱ्यांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही लोकमतसोबत सरपंच पुरस्कार देण्यासाठी सहभाग घेतला आहे़
- रवींद्र शहाणे, उपाध्यक्ष (पणन), महिंद्रा फार्म डिव्हिजन.
लोकमत सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला़ असा अभूतपूर्व कार्यक्रम घेण्यात बीकेटी टायर्सला आनंद होत आहे़ बीकेटी टायर्स मीडिया प्रमोशन आणि रोड शो यांचाही आम्हाला चांगला फायदा झाला आहे़ आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये लोकांची रुची वाढत आहे़
- राजीव पोद्दार, सहव्यवस्थापकीय संचालक, बीकेटी टायर्स