सरकारी कामांसाठी स्वस्त दरात सिमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2015 02:17 AM2015-04-17T02:17:34+5:302015-04-17T02:17:34+5:30
लोकोपयोगी कामासाठी उभारण्यात येणाऱ्या सरकारी प्रकल्पांसाठी बाजारभावापेक्षा कमी दरात सिमेंट उपलब्ध करून
केंद्राची योजना: आॅनलाईन खरेदीची सोय
नागपूर : लोकोपयोगी कामासाठी उभारण्यात येणाऱ्या सरकारी प्रकल्पांसाठी बाजारभावापेक्षा कमी दरात सिमेंट उपलब्ध करून देण्याची सोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते विकास मंत्रालयाने ‘इनाम’ या योजनेच्या माध्यमात उपलब्ध करून दिली आहे. ही योजना ‘आॅनलाईन’आहे.
केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग खात्याचे सहसचिव संजय जाजू यांनी ही माहिती दिली. मिहान आढावा बैठकीनंतर नितीन गडकरी यांनी रस्ते विकास व महामार्ग यासंदर्भात बैठक घेतली. त्यानंतर जाजू यांनी त्यांच्या खात्याच्या स्वस्त दरातील सिमेंट योजनेची माहिती दिली. ते म्हणाले की, देशभरात सरकारी यंत्रणेकडून अनेक प्रकल्पांचे बांधकाम केले जाते. यासाठी लागणाऱ्या सिमेंटची गरज मोठी असते. देशभरातील सिमेंट कंपन्या आणि त्यांचे खरेदीदार यांना एका व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी ‘इनाम’ योजना सुरू करण्यात आली आहे. विविध सिमेंट कंपन्या या संकेतस्थळावर नोंदणी करीत आहेत.
खरेदीदाराला सिमेंट हवे असेल तर त्यांनी इनामच्या संकेतस्थळाला भेट देऊन तेथे आपली मागणी नोंदवायची आहे. त्यानंतर संबंधित कंपनीकडून ग्राहकाला त्यांच्या जवळच्या प्रकल्पातून सिमेंट उपलब्ध करून दिले जाते. आतापर्यंत देशभरातील ३३ मोठ्या सिमेंट कंपन्यांच्या १०० प्रकल्पांची नोंदणी या संकेतस्थळावर झाली असून ९५ लाख मे.टन सिमेंट उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. बाजारभावापेक्षा प्रति सिमेंट बॅग ५० ते १०० रुपयाने हे दर कमी आहेत. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक खरेदीदारांनी मागणी नोंदविली आहे, असे जाजू म्हणाले. स्वस्त दरातील सिमेंटमुळे प्रकल्पावरील खर्चात बचत होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सिमेंटच्या दरात घट होत असल्याने कंपन्यांनाही मोठे खरेदीदार या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. सध्याच्या पारंपरिक पद्धतीला मोडीत काढणारी ही योजना ‘आॅनलाईन शॉपिंग’च्या धर्तीवर आहे. यामुळे सवलतीच्या दरात शासकीय कामासाठी सिमेंट उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायतपासून महापालिका किंवा सरकारच्या अखत्यारितील बांधकाम करणारी कोणतीही यंत्रणा ही मागणी नोंदवू शकते. (प्रतिनिधी)