सिमेंट बंधारा ठरतोय अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:12 AM2021-08-21T04:12:53+5:302021-08-21T04:12:53+5:30
कळमेश्वर : आष्टीकला व निमजी शिवारात नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास शेतीला मारक ठरत आहे. यामुळे ...
कळमेश्वर : आष्टीकला व निमजी शिवारात नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास शेतीला मारक ठरत आहे. यामुळे हा बंधारा तोडून तो दुसऱ्या जागी बांधावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. परिणामी तालुक्यात सातशे ते आठशे फूट बोअरवेल करून भूगर्भातून पाण्याचा उपसा सुरू आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे ओलित विहिरीवर अवलंबून आहे अशा विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने ओलितास पाणी पुरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पावसाचे पाणी शिवारातील जमिनीत मुरावे व भूगर्भातील पाणी पातळी वाढावी याकरिता शासनाच्या वतीने ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. असाच बंधारा आष्टीकला-निमजी शिवारातून वाहणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आला. नाल्याच्या काठावर भुजंग नत्थू डाफ, देवराव नत्थू डाफ, दुर्गा विठोबा शिंगणे, नारायण श्रावण कसरे, अशोक तानबा भोयर, निंबा वरलू बांबल, यादोराव मारोती खडसे, पुरुषोत्तम शामराव डेहनकर, मो. जमीन. मो. अली अमीन, बापूराव लक्ष्मण निखाडे, शीला भगवान भोयर या शेतकऱ्यांची शेती आहे. या नाल्याला दोन वेगवेगळ्या नाल्याचे पाणी येत असल्याने तसेच हा बंधारा मातीने बुजल्याने नाल्याकाठावर असलेल्या शेतातून पाण्याचा प्रवाह वाहतो. तसेच नाल्याकाठावरील जमिनीचा भाग खचून जात असल्याने शेतीपिकांसोबतच शेतीचेसुद्धा नुकसान होते. यामुळे या बंधाऱ्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.