सभागृहात गाजणार सिमेंट रोड
By admin | Published: May 8, 2017 02:28 AM2017-05-08T02:28:28+5:302017-05-08T02:28:28+5:30
शहरातील काही भागातील पाणीटंचाई व कासवगतीने सुरू असलेली सिमेंट रोडची कामे या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विरोधक आक्रमक : महापालिकेची आज सर्वसाधारण सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील काही भागातील पाणीटंचाई व कासवगतीने सुरू असलेली सिमेंट रोडची कामे या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच स्वच्छतेत नागपूर माघारल्याच्या मुद्यावरून सोमवारी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी शहरात सिमेंट रोडची कामे धडाक्यात सुरू होती. परंतु निवडणुका संपताच अनेक रोडची कामे बंद आहेत. अर्धवट व दर्जाहीन कामे होत असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांना याचा त्रास होत आहे. या विरोधात विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा विषय सभागृहात मांडण्याच्या सूचना त्यांनी काँग्रेसच्या सदस्यांना केल्या आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात सिमेंट रोडच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांना उन्हाचा अधिक त्रास होतो. सिवरेजची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाचे पाणी वस्त्यांत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचे पडसाद सभागृहात उमटणार आहे.
अनेक रोडचे काम गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे. काही रोडचे सिमेंटीकरण करण्यात आले. परंतु फुटपाथ बेपत्ता झाले. यासंदर्भात तक्रारी असूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.
‘लोकमत’चा प्रभाव
सिमेंट रोडच्या अर्धवट व कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात मोठ्या संख्येने नागरिकांनी लोकमतकडे तक्रारी केल्या आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘लोकमत’ने सिमेंट रोडची वृत्तमालिका प्रकाशित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याची दखल घेत संजय महाकाळकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला. हा मुद्दा सभागृहातही उपस्थित क रणार असल्याची माहिती त्यांनी दिली.