ब्लॅकलिस्टेड कंपनीला सिमेंट रस्त्याचे कंत्राट
By Admin | Published: May 14, 2016 02:51 AM2016-05-14T02:51:48+5:302016-05-14T02:51:48+5:30
सिमेंट रस्त्यांची कामे समाधानकारक न केल्याने मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या (ब्लॅक लिस्ट)आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेड यांच्यावर नागपूर...
नागपूर महापालिकेची कृपा : मुंबई महापालिकेने टाकले काळ्या यादीत
नागपूर : सिमेंट रस्त्यांची कामे समाधानकारक न केल्याने मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या (ब्लॅक लिस्ट)आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेड यांच्यावर नागपूर महापालिकेची मात्र कृपादृष्टी आहे. यातूनच सिमेंट रस्त्यांच्या सात टप्प्यातील तब्बल चार टप्पे या कंपनीला देण्यात आले आहे.
आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीला मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त व मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांना विचारणा केली असता या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारकडूनही या संदर्भात कोणत्याही स्वरुपाच्या सूचना प्राप्त झालेल्या नाही. शहरातील रिंगरोडचे काम याच कंपनीकडे असल्याने या कंपनीकडून शहरातील सिमेंट रस्त्यांचे काम करून घेणार असल्याची माहिती देबडवार यांनी दिली.
शहरात ३२४ कोटींचे १८ टप्प्यात सिमेंट रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यातील ६ टप्प्यातील ८ कामाच्या निविदा यापूर्वीच काढण्यात आल्या आहेत. शुक्र वारी स्थायी समितीच्या बैठकीत या कंपनीला टप्पा ५ व ७ मधील कामे देण्यात आली.
या कंपनीला ५२.८८ कोटींची कामे देण्यात आलेली आहेत. तर तीन टप्प्यातील कामे जे.पी. इंटरप्रायजेस, दिशा डायनामिक्स व आर.एम. दयारानी या कंत्राटदारांना देण्यात आलेली आहेत.
मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटारांकडून नागपूर शहरातील कामे चांगली होतील की नाही, हे तर भविष्यातच कळणार आहे. (प्रतिनिधी)
तक्रार प्राप्त
झालेली नाही
आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेडबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. शहरालगतच्या रिंगरोडचे काम या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने शर्थी व अटींची पूर्तता केली आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्याचे काम देण्यात आले आहे परंतु ठोस माहिती प्राप्त झाल्यास फेरविचार केला जाईल.
सतर्कता बाळगू
आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेड कंपनीने नियमानुसार निविदा दाखल के ली आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्याचे काम देण्यात आले आहे. रस्त्याचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी कामाच्या पहिल्या दिवसापासून सतर्कता बाळगू.
-बंडू राऊत,
अध्यक्ष स्थायी समिती