सिमेंट रोड कंत्राटदार कारवाईच्या रडारवर
By admin | Published: May 3, 2017 02:18 AM2017-05-03T02:18:58+5:302017-05-03T02:18:58+5:30
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील विकास कामे स्मार्ट दर्जाची झाली पाहिजे.
महापौरांचा इशारा : मनपा सभागृहात गाजणार मुद्दा
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील विकास कामे स्मार्ट दर्जाची झाली पाहिजे. यात कोणत्याही प्रकारची तडजोड नाही. त्यामुळे निकृष्ट सिमेंट रोडची कामे खपवून घेणार नाही. असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी दिला .
शहरातील सिमेंट रोडची कामे निकृष्ट झाल्याच्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. सामाजिक संघटनांनीही सिमेंट रोडची कामे स्मार्ट सिटीला साजेशी व्हावी. जनतेच्या पैशाचा सदुपयोग व्हावा, अशी मागणी केली आहे. विकास कामे उत्तम दर्जाची व्हावी. या हेतूने रखडलेले सिमेंट रोड व उत्तम दर्जाचे काम होत नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. याकडे लक्ष वेधले असता महापौरांनी हा इशारा दिला.
सिमेंट रोडच्या निकृष्ट कामासंदर्भातील सर्व तक्रारींची दखल घेतली जाईल. या सोबतच महापालिका आयुक्त व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सोबत घेऊ न शहरातील इतरही सिमेंट रोडची पाहणी करू. रोडच्या कामात त्रुटी आढळून आल्यास त्या दूर करण्याचे निर्देश देण्यात येईल. रोडचे काम पूर्ण झाले व उत्तम दर्जाचे असल्याबाबतचा अहवाल आल्यानंतरच संबंधित कंत्राटदारांना बिल देण्यात येईल, अशी भूमिका महापौरांनी मांडली.
सिमेंट रोडची कामे करताना पावसाळी नाल्या, सिवेज लाईनची कामे काही ठिकाणी व्यवस्थित झालेली नाही. फू टपाथच्या कामाबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत.अशा सर्व तक्रारींची दखल घेतली जाईल.
रोडवर पाणी साचणार
सिमेंट रोड समतल असणे अपेक्षित आहे. परंतु काही ठिकाणी रोड उंच तर काही ठिकाणी खोलगट आहे. काही ठिकाणी सिमेंट रोडचा भाग खोलगट आहे. या खोलगट भागात पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. याचा आजूबाजूच्या नागरिकांना पावसाळ्यात त्रास होणार आहे.
चौकशी समिती गठित करा : महाकाळकर
नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. विकास कामाला आमचा विरोध नाही. परंतु सिमेंट रोडची कामे चांगल्या दर्जाची व्हावीत. ती स्मार्ट सिटीला साजेशी झाली पाहिजे, यावर सर्वसामान्यांचा पैसा खर्च होत आहे. याचा सदुपयोग झाला पाहिजे. परंतु सुरू असलेल्या सिमेंट रोडच्या कामाचा दर्जा चांगला नसल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही रोडची पाहणी केली असता यात सत्यता आढळून आली. त्यामुळे निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी महापालिकेतील सर्वपक्षीय सदस्य व तसेच बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच्या सिमेंट रोडला भेगा पडल्या आहेत. महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या हुडकेश्वर सिमेंट रोडवर ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स, पिनाक भंडार, चिटणवीसपुरा बँक आदी ठिकाणी रोडवर भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी रोडवरील सिमेंटचा थर उखडला आहे. त्यामुळे गिट्टी बाहेर आली आहे. शहरातील इतर भागातील सिमेंट रोडची अशीच अवस्था आहे. सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाकाळकर यांनी केली. यासंदर्भात महापालिका सभागृहात प्रश्न उपस्थित करून चौकशी समिती गठित करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.