कोळशाच्या राखेपासून तयार सेनोस्फेयरची कवडीमोल भावात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:45 AM2020-08-26T11:45:26+5:302020-08-26T11:47:17+5:30
विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेपासून तयार होणारे मौल्यवान सेनोस्फेयर कवडीमोल भावात विकले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी वीज निर्मिती कंपनी महाजेनकोमध्ये सध्या गोलमाल सुरू आहे. विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेपासून तयार होणारे मौल्यवान सेनोस्फेयर कवडीमोल भावात विकले जात आहे. जवळपास २० कोटी रु. किंमत असलेले सेनोस्फेयर केवळ २० लाख रुपयात विकल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने हा व्यवहार पाहण्यासाठी महाजेम्स नामक कंपनी तयार करून स्वत:चे अंग काढून घेतले. जबाबदार असलेल्या महाराष्ट्र स्टेट फ्लाय अॅश कौन्सिलने यावर्षी बैठकही घेतली नाही.
महाजेनकोच्या कोराडी आणि खापरखेडास्थित औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणात राख बाहेर निघते. ही राख एकत्रित करण्यासाठी वारेगाव, कोराडी व खसारा येथे डम तयार करण्यात आले आहे. शिवाय पारशिवनी तालुक्यात एक धरण प्रस्तावित आहे. येथून राख घेण्यासाठी स्थानिक पातळीवर कंत्राट काढले जाते. राख डमच्या तलावाच्या काठावर जमा होते आणि सेनोस्फेयर पाण्यावर तरंगतो. सेनोस्फेयरसाठी वेगळी निविदा काढली जात नाही. राखेच्या निविदेसह त्याचाही निपटारा केला जातो. मात्र बाजारात या सेनोस्फेयरचे मूल्य अनेक पटीने अधिक आहे. बाजारात या राखेचे मुल्य १२०० रुपये टन असून सेनोस्फेयरची किंमत ६५ हजार रुपये टन आहे.
पूर्ण राज्याचा विचार केल्यास सरकारी विद्युत केंद्रातून जवळपास २० कोटी रुपये किमतीचे सेनोस्फेयर निघते. मात्र राखेच्या निविदेत ३ लाख रुपये प्रति डमनुसार ते केवळ २० लाख रुपयात खाजगी लोकांना विकले जाते.
काय आहे सेनोस्फेयर?
सेनोस्फेयर औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या कोळशाच्या राखेचे रूप आहे जो हलका आणि गुळगुळीत असतो. हा सिलिका व अल्युमिनाद्वारे निर्मित असून त्यात हवा भरली असते. मात्र हा अतिशय टणक असल्याने त्याचा उपयोग हलकी आणि कठीण वस्तूंच्या निर्मिती कार्यात केला जाऊ शकते. टाईल्स आणि फॅब्रिकसमध्ये त्याचा उपयोग होतो. मशीन्सचे घर्षण नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
कोट्यवधींचा महसूल बुडतो
महाराष्ट्र स्टेट फ्लाय अश कौन्सिलचे सदस्य सुधीर पालिवाल यांनी, सेनोस्फेयरकडे दुर्लक्ष केल्यामुळे महाजेनको आणि राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे स्वीकार केले. सेनोस्फेयरबाबत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातक देश आहे. आणि त्याचा लाभ घेतला तर वाणिज्यिक फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विजेचे दर कमी करण्यासाठी ही कमाई महत्वाची ठरेल. मात्र सरकार या दिशेने काम करीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.