बुद्धपाैर्णिमेची प्राणीगणना यावर्षीही रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:18+5:302021-05-17T04:07:18+5:30
२६ मे राेजी बुद्धपाैर्णिमा आहे आणि गेल्या वर्षी नाही तर यावर्षी तरी वन्यप्राण्यांची गणना हाेईल, अशी अपेक्षा केली जात ...
२६ मे राेजी बुद्धपाैर्णिमा आहे आणि गेल्या वर्षी नाही तर यावर्षी तरी वन्यप्राण्यांची गणना हाेईल, अशी अपेक्षा केली जात हाेती. मात्र यावर्षी पुन्हा काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने अपेक्षाभंग केला आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी यावर्षीही प्राणी गणना घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या कार्यालयाद्वारे परिपत्रक काढून व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तसेच विविध जिल्ह्याचे प्रादेशिक मुख्य वनरक्षकांना पाठविण्यात आले आहे. त्यानुसार यावेळीही राज्यभरात काेठेही प्राणी गणना हाेणार नाही.
यावर्षी ग्रामीण भागातही काेराेनाने थैमान घातले आहे, त्यामुळे शारीरिक अंतर पाळणे आवश्यक आहे. शिवाय काेराेनामुळे विविध जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या कामाशिवाय इतर जिल्ह्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पात काम करणारे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक ठराविक ठिकाणी पाेहचू शकणार नाही. विशेष म्हणजे काेराेनाचा प्रकाेप हवा तसा ओसरलेला नाही व अशावेळी काेठेही जाणे धाेक्याचे कारण ठरू शकते. या सर्व बाबी लक्षात घेत बुद्धपाैर्णिमेला हाेणारी प्राणी गणना रद्द करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.