मानकापूर क्र्र ीडा संकुलात होणार शतकोत्तर सुवर्ण महोत्सव
By admin | Published: August 30, 2015 02:51 AM2015-08-30T02:51:08+5:302015-08-30T02:51:08+5:30
नागपूर महापालिकेला १५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या तयारीला मनपा प्रशासन लागले आहे.
प्रशासन लागले कामाला : राष्ट्रपतींच्या स्वागताची तयारी
नागपूर : नागपूर महापालिकेला १५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या तयारीला मनपा प्रशासन लागले आहे. यशवंत स्टेडियम येथे हा समारंभ होणार असल्याची चर्चा होती. परंतु यासाठी मनकापूर क्रीडा संकुलाची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रपती प्रवण मुखर्जी महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून संमती पत्र प्राप्त होताच प्रशासन कामाला लागले आहे. महोत्सव प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते भांडेवाडी येथील विस्तारीत मलनिस्सारण प्रकल्प व मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच मुखर्जी यांच्याहस्ते मनपाच्या इतिहासावर आधारित गौरव ग्रंथाचे लोकार्पण केले जाणार आहे.
मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व पोलीस आयुक्त एस.पी.यादव यांच्यात सुरक्षा व्यवस्थेवर नुकतीच बैठक झाली. त्यानंतर पोलीस पथकाने मानकापूर क्रीडा संकुलाची पाहणी केली. राष्ट्रपती उपस्थित राहणार असल्याने क्रीडा संकुलाला पोलीस छावणीचे स्वरूप येणार आहे. येत्या मंगळवारी महोत्सवाचा अंतिम आराखडा तयार करून विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याशी विविध विभागाचे अधिकारी चर्चा करणार आहे. कार्यक्रमाचा आराखडा निश्चित झाल्यानंतर राज्याचे मुख्य सचिवांना याची माहिती दिली जाणार आहे.
त्यांच्या कार्यालयाकडून राष्ट्रपती कार्यालयाला कार्यक्रमाची विस्तृत माहिती पाठविली जाणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरी नंतर कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यानंतर प्रोटोकालनुसार कार्यक्रमाच्या पत्रिका छापल्या जाणार आहे. (प्रतिनिधी)