विदर्भातील नक्षलवादावर केंद्राचे लक्ष केंद्रित
By admin | Published: May 14, 2015 02:37 AM2015-05-14T02:37:54+5:302015-05-14T02:37:54+5:30
छत्तीगडमधील दंतेवाडा येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलींना शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन
नागपूर : छत्तीगडमधील दंतेवाडा येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलींना शस्त्र खाली ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर आता केंद्राने विदर्भातील नक्षल चळवळीवर लक्ष केंद्रित केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे गुरुवारी नागपुरात येत आहेत. ते विदर्भातील ‘अॅन्टी नक्सल आॅपरेशन’चा आढावा घेणार आहेत. रेशीमबाग येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष सभेलादेखील ते उपस्थित राहणार आहेत.
राजनाथसिंग यांचे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता दिल्ली येथून बीएसएफच्या विशेष विमानाने नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते रेशीमबाग येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष सभेला उपस्थित राहतील. यानंतर रविभवन येथे विदर्भातील ‘अॅन्टी नक्सल आॅपरेशन’च्या बैठकीला उपस्थित राहतील.
या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, याशिवाय भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विदर्भात आजवर झालेले नक्षली हल्ले, पोलिसांनी केलेल्या कारवाया यासह नक्षलवाद रोखण्यासाठी राबवायच्या ‘अॅक्शन प्लान’वर चर्चा होणार आहे. दंतेवाडा येथे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी जगदलपूर येथे रेल्वेचा रूळ उखडून टाकला होता, तर ५०० गावकऱ्यांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. या घटनाक्रमानंतर लगेच गृहमंत्री राजनाथसिंग यांच्याकडून विदर्भात नक्षल आढावा बैठक घेतली जात असल्याने सुरक्षा यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. (प्रतिनिधी)