केंद्राने अडविले नागपुरातील ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 09:28 PM2018-01-15T21:28:08+5:302018-01-15T21:38:33+5:30
केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणाला पाठविण्यासाठी मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभाग मंजुरीच देत नसल्याने गेल्या वर्षभरापासून हे केंद्र रखडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. दरम्यानच्या काळात एका आरोग्य अधिकाऱ्यासह पाच जणांना प्रशिक्षण देण्यात आले. परंतु प्रशिक्षणप्राप्त करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचीच बदली करण्यात आली. तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणाला पाठविण्यासाठी मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभाग मंजुरीच देत नसल्याने गेल्या वर्षभरापासून हे केंद्र रखडले आहे. या लसीसाठी मध्य भारतातील लोकांना मुंबई गाठावी लागत आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक भारतीयाला आफ्रिकन देशात जाण्यापूर्वी ‘येलो फिव्हर' लस टोचली जाते. आंतरराष्ट्रीय व्हिसा नियमांतर्गत ही लस टोचून घेणे बंधनकारक आहे. सध्या आफ्रिकन देशात जाण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना लस टोचण्यासाठी राज्यात आरोग्य विभागाची मुंबई व पुण्यातच सोय आहे. नागपुरात एका खासगी इस्पितळाला याची परवानगी दिली आहे. परंतु येथे लसीचा तुटवडा, तसेच मोठी किंमतही चुकवावी लागत असल्याने नाईलाजाने अनेकांना मुंबई जवळ करावी लागते.
डागा रुग्णालयाचा पुढाकार
नागपूरच्या शासकीय सेवेत हे लसीकरण केंद्र सुरू झाल्यास मध्य भारतातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार होता. शिवाय मुंबईच्या केंद्रात होणारी गर्दी कमी होणार होती. ही बाब लक्षात घेत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी या संदर्भात प्रस्ताव पाठविला. त्याला मंजुरी मिळाली. डागा रुग्णालयाने यासाठी पुढाकार घेत हे केंद्र स्थापित करण्याचा निर्णयही घेतला. एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह, परिचारिका, फार्मसिस्ट व चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा पाच जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. परंतु प्रशिक्षण प्राप्त करून येताच वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. यामुळे दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा प्रस्ताव मुंबई येथील केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. परंतु अद्यापही याला मंजुरी न मिळाल्याने हे केंद्र तूर्तास तरी कागदावरच आहे.
मेडिकलनेही पाठविला होता प्रस्ताव
दोन वर्षांपूर्वी नागपूर मेडिकलच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाकडून येलो फिव्हर लसीकरण केंद्राचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. विशेष म्हणजे, यासाठी अधिकृत अधिकारी म्हणून डॉ. अविनाश गावंडे व डॉ. समीर गोलावार यांची नेमणूक करण्यात आली होती.