केंद्र अधिकाऱ्यांनी वाचवले अनेकांचे प्राण
By admin | Published: May 14, 2016 03:05 AM2016-05-14T03:05:26+5:302016-05-14T03:05:26+5:30
देशातील महत्त्वाचा धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव असलेला सिंहस्थ कुंभमेळा सध्या उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर सुरू आहे.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र : सिंहस्थ कुंभमेळा
नागपूर : देशातील महत्त्वाचा धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव असलेला सिंहस्थ कुंभमेळा सध्या उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर सुरू आहे. या पर्वावर सांस्कृतिक चेतना निर्माण करण्यासाठी संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि मध्यप्रदेश शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाची जबाबदारी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राकडे देण्यात आली असून उज्जैन येथे जोरदार वादळी पाऊस आला. यामुळे तेथे बांधलेले तंबू आणि शामियाना कोसळला. वादळामुळे शामियानावरील टिना उडल्या. यात आठ नागरिकांना प्राण गमवावा लागला. अशावेळी अधिक हानी होऊ नये म्हणून केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जीवावर उदार होत अनेकांचे प्राण वाचविले.
गढकालिका मंदिराजवळील विक्रमादित्य मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांसह राष्ट्रीय चित्रकारांचेही सादरीकरण सुरू असताना अचानक वादळी पाऊस आला. याप्रसंगी ५० ते ६० राष्ट्रीय चित्रकार शामियानात होते. वादळामुळे टिना उडत होत्या आणि शामियाना कोसळत होता. पावसाने रौद्र रूप धारण केले. यावेळी कोसळलेल्या शामियानाखाली अनेक कलावंत दबले. दुर्घटनास्थळावर केंद्राचे अधिकारी दीपक कुळकर्णी, गोपाल बेतावार, दीपक पाटील, शशांक दंडे, अनिल ठाकरे, प्रवीण, सूरज, नीलेश, डेव्हीड, गणपत, प्रजापती आदींनी प्रयत्न करून दबलेल्या कलावंताना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविले.
वाहनचालक योगेश श्रीरामे एका उडत्या टिनने जखमी झाले पण तरीही त्यांनी कलावंतांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी पुढाकार घेतला. मध्यप्रदेश शासनाच्या कर्मचाऱ्यांनीही या कामात सहकार्य केले. मध्यप्रदेश सरकारने या गंभीर वादळाची दखल घेत तीन दिवस सर्व कार्यक्रम स्थगित केले होते. केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे अनेक कलावंतांना सुरक्षित राहिले. याबाबत केंद्र अधिकाऱ्यांची प्रशंसा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)