पश्चिम बंगालमधील हिंसाचार नियंत्रणासाठी केंद्राने पावले उचलावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:55+5:302021-05-08T04:07:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर तेथे सुरू असलेल्या राजकीय हिंसाचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर तेथे सुरू असलेल्या राजकीय हिंसाचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील हिंसा पूर्वनियोजित आहे. तेथे लोक कायदा हातात घेत असताना तेथील शासन मूकदर्शक बनले आहे. केंद्र सरकाराने बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी व राज्य शासनालादेखील त्या दिशेने कारवाई करण्यास बाध्य करावे, असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी बंगालमधील स्थितीसंदर्भात निवेदन जारी केले आहे. लोकशाहीत निवडणुकांची मौलिक भूमिका असते. निवडणूक कालावधीत आरोप-प्रत्यारोप होतातच. मात्र सर्व पक्ष, उमेदवार, त्यांचे समर्थक व मतदार आपल्या देशातीलच नागरिक आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर अनियंत्रित पद्धतीने सुरू असलेला हिंसाचार निंदनीय आहे. यामुळे कूचबिहार ते सुंदरबनपर्यंत जनतेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ही हिंसा भारतीय परंपरा तसेच भारतीय संविधान व लोकशाहीच्या मूळ भावनेच्या विरोधातील आहे. शासन व प्रशासन मूकदर्शक असल्याची बाब सर्वात जास्त दुःखद आहे. दंगे करणाऱ्यांमध्ये शासनकर्त्यांची कुठलीही भीती नाही व शासनाकडूनदेखील नियंत्रणासाठी प्रभावी पुढाकार घेण्यात आलेला नाही हे दुर्दैवी चित्र आहे, अशी भावना होसबळे यांनी व्यक्त केली.
समाजात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून शांतता स्थापित करणे हे कुठल्याही शासनाचे पहिले कर्तव्य असते. निवडणुकीत पक्षाचा विजय होतो, परंतु निवडून आलेले सरकार संपूर्ण समाजाप्रति जबाबदार असते. त्यामुळे बंगालमधील नवनिर्वाचित सरकारने त्वरित कायद्याचे राज्य प्रस्थापित करून दोषींना अटक केली पाहिजे, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे. या हिंसेविरोधात समाजातील विद्वान व बुद्धिजीवींसह विविध स्तरांतील लोकांनी एकत्रित येऊन सद्भावना व शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पीडित कुटुंबांना आधार द्यावा, असे आवाहन होसबळे यांनी केले आहे.