पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा; विजय दर्डा यांची अमित शाह यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 12:53 PM2023-02-18T12:53:42+5:302023-02-18T12:54:26+5:30
Lokmat News: पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा, अशी मागणी विजय दर्डा यांनी केली आहे.
नागपूर - ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी पत्रकारांसाठी एक महत्त्त्वपूर्ण मागणी अमित शाह यांच्याकडे केली आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा करावा, अशी मागणी विजय दर्डा यांनी केली आहे.
याबाबत अमित शाह यांच्याकडे मागणी करताना विजय दर्डा म्हणाले की, आज मी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे एक मागणी करणार आहे. हा प्रश्न मी माझ्या राज्यसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळामध्ये संसदेतही उपस्थित केला होता. या देशात हजारो पत्रकार, फोटोग्राफर आहेत. ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काम करतात. त्यांच्यावर वेळोवेळी हल्ले होत असतात. तुम्ही एक असा कायदा बनवा ज्यामुळे ते सुरक्षित राहतील, माझ्या या मागणीचा तुम्ही विचार कराल, अशी अपेक्षा आहे, विजय दर्डा म्हणाले.
यावेळी विजय दर्डा यांनी जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला. ते म्हणाले बाबूजींनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलं आहे. बॅकबे रेक्लमेशन असेल किंवा महाराष्ट्रात हौसिंग निर्मिती असेल किंवा वीजनिर्मिती असेल किंवा उद्योग असेल, याबाबतीत त्यांनी योगदान दिले आहे. बाबूजींच्या योगदानाची दखल घेत त्यांच्यावर नाणं काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी ११ वाजता नागपूरच्या रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात महासोहळा सुरू आहे. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित आहेत. सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित आहेत.