केंद्रीय प्रवेश प्रणाली कागदावरच

By admin | Published: June 1, 2017 02:19 AM2017-06-01T02:19:04+5:302017-06-01T02:19:04+5:30

बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र यंदापासून केंद्रीय पद्धतीनेच

Central entrance system on paper | केंद्रीय प्रवेश प्रणाली कागदावरच

केंद्रीय प्रवेश प्रणाली कागदावरच

Next

शासनाकडून अद्यापही निर्देश नाही : महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया संभ्रमातच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र यंदापासून केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. मात्र अंमलबजावणीसंदर्भात शासनाने कुठलेही पाऊल उचलले नसून ही प्रवेशप्रणाली अद्यापही कागदावरच आहे. अशा स्थितीत प्रवेशप्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने करावी याबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रमच आहे.
पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठातील सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रणाली राबविणार असल्याची राज्य शासनाने घोषणा केली होती. नागपूर विद्यापीठानेदेखील याची तयारी केली होती. सुमारे दोन महिन्यांअगोदर राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला एक पत्र पाठविले. राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यामुळे विद्यापीठाने स्वतंत्र प्रक्रिया राबवू नये, असे त्यात नमूद होते. तीन महिन्याअगोदर पुण्यात बैठकदेखील झाली. मात्र त्यानंतर कुठलीही पावले राज्य शासनाकडून उचलण्यात आली नाही.
नागपूर विद्यापीठात सुमारे ६५० महाविद्यालये आहेत. यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सोडली तर कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेत महाविद्यालयांच्या स्तरावर प्रवेश होतात. सर्वच विद्यार्थ्यांचा कल नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे असतो. यामुळे अनेकदा एकच विद्यार्थी प्रवेशासाठी चार ते पाच महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे अर्ज करतो.

योजना बारगळणार ?
केंद्रीभूत प्रवेश प्रणाली राबविण्यासाठी विविध निविदा प्रक्रिया व ‘डाटा’ गोळा करणे ही कामे करावी लागणार आहे. यासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. इतक्या कमी वेळात ही माहिती गोळा करणे कठीण काम आहे. अशा स्थितीत राज्याने पुढाकार घेतला नाही तर केंद्रीय प्रवेशाची योजना बारगळण्याचीच चिन्हे आहेत.

राज्य शासनाकडून उत्तरच नाही
विद्यापीठांनी ही प्रक्रिया राबवू नये, शासनच यात पुढाकार घेईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. याबाबत शासनासोबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैठकदेखील झाली. मात्र त्यानंतर काहीच निर्देश आलेले नाहीत. आम्ही पत्रव्यवहारदेखील करून विचारणा केली. मात्र त्याचेदेखील उत्तर अद्याप आलेले नाही. बारावीचा निकाल लागला असल्यामुळे आता महाविद्यालयांच्या पातळीवरच प्रवेशप्रक्रिया राबविणे सोयीस्कर ठरणार आहे, असे मत नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.

Web Title: Central entrance system on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.