केंद्राच्या अखत्यारितील ३४ टक्के 'क्वॉर्टर्स' रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:54 PM2019-09-23T22:54:18+5:302019-09-23T22:55:50+5:30
केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी उपराजधानीत अठराशेहून अधिक रहिवासी गाळे (‘क्वॉर्टर्स) आहेत. यातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३४ टक्के गाळे रिकामे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी उपराजधानीत अठराशेहून अधिक रहिवासी गाळे (‘क्वॉर्टर्स) आहेत. यातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३४ टक्के गाळे रिकामे आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत संपदा संचालनालयाकडे विचारणा केली होती. संचालनालयाच्या अखत्यारित किती शासकीय कार्यालये व रहिवासी गाळे येतात, यातील किती कार्यालये व गाळे रिकामे आहेत, रिक्त असलेल्या एकूण जागेचे क्षेत्रफळ किती आहे व संचालनालयात किती रिक्त पदे आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार संपदा संचालनालय व सहायक संपदा व्यवस्थापन कार्यालयाअंतर्गत नागपुरात ३ लाख ३२ हजार २९४ चौरस फुटांची जागा कार्यालय व रहिवासी गाळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. याअंतर्गत १ हजार ८८८ रहिवासी गाळे येतात. यातील १ हजार २३३गाळ्यांचेच वाटप झाले असून ६५५ गाळे रिकामे आहेत. उपलब्ध असलेल्यापैकी एकही कार्यालय रिकामे नाही.
दरम्यान, संपदा संचालनालय व सहायक संपदा व्यवस्थापन कार्यालयाअंतर्गत १६ मंजूर पदे आहेत. यातील ४ पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत.