शंभर कोटींच्या ठगबाजी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा ‘ॲक्टिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 11:07 AM2021-11-10T11:07:49+5:302021-11-10T11:11:17+5:30
‘लोकमत’ने या प्रकरणाला शंभर कोटींपेक्षा अधिकचे असल्याचे म्हटल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा पोलिसांकडून माहिती घेत आहेत. यामुळे पंकज मेहाडिया व अन्य आरोपींशी निगडित लोकांमध्ये खळबळ माजली आहे.
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जादा व्याज आणि कॅश डिस्काऊंटचे प्रलोभन देऊन कोट्यवधींची फसवणूक करण्याच्या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत. ‘लोकमत’ने या प्रकरणाला शंभर कोटींपेक्षा अधिकचे असल्याचे म्हटल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा पोलिसांकडून माहिती घेत आहेत. यामुळे पंकज मेहाडिया व अन्य आरोपींशी निगडित लोकांमध्ये खळबळ माजली आहे.
१ नोव्हेंबरला सीताबर्डी पोलीस ठाण्यात पंकज मेहाडिया, त्यांची आई प्रेमलता मेहाडिया, सोबती लोकेश संतोष जैन, कार्तिक संतोष जैन, बालमुकुंद लालचंद केयाल यांच्याविरोधात ८.१६ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दगडी पार्क, रामदासपेठ निवासी अशोक अग्रवाल व त्यांच्या नातेवाईकांनी २०१७ मध्ये आरोपींच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. त्यांना १२ टक्के दराने व्याज देण्याची थाप देऊन आरोपींनी त्यांना ठगवले होते.
तीन वर्षांपासून अग्रवाल आरोपींकडे पैशासाठी चकरा मारत होते. तोडगा निघत नसल्याचे बघून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी केवळ ८.१६ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, बाजारातील सूत्र ही फसवणूक शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिकची असल्याचा दावा करत आहेत. ‘लोकमत’ने यासंदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत केंद्रीय तपास यंत्रणा सजग झाल्या आहेत. ते आरोपी व पीडितांची सखोल माहिती गोळा करत आहेत.
मेहाडिया २०१३ पासून बार ट्रेडमध्ये लिप्त होते. त्यापूर्वी ते स्क्रॅपचा व्यापार करत होते. बाजारात प्रतिष्ठा असल्याने मेहाडिया कंपनीला ८-१० वर्षांत १०० ते १२५ कोटी रुपयाची गुंतवणूक प्राप्त झाली. तीन वर्षांपूर्वी जेव्हा मेहाडिया कंपनीने रक्कम परत करण्यास आनाकानी केली तेव्हा पीडित व्यापाऱ्यांनी आपापल्या स्तरावर पैसा परत मिळविण्याचे प्रयत्न केले. काही व्यापाऱ्यांना यात यशही आले. परंतु, रोख रक्कम, वित्त संस्थांची नजर आणि पोलिसी कारवाईच्या भीतीने अनेक व्यापारी शांतचित्ताने प्रकरणाकडे लक्ष ठेवून होते.
आर्थिक गुन्हे शाखेचा ताबा संपताच पंकज मेहाडियाला न्यायालयात हजर करण्यात आले. तपासाच्या प्रगतीच्या आधारावर न्यायालयाने मेहाडियाचा ताबा १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. मेहाडियाच्या फसवणुकीला बळी पडलेल्या अन्य व्यापाऱ्यांनीही पोलिसांशी संपर्क साधल्याचे प्रकाशात येत आहे. त्यामुळे, पीडितांशी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना संक्रमणाचे सांगितले जात आहे कारण
कोरोना संक्रमण आणि बार ट्रेडमधील किमतीत झालेला प्रचंड उतार-चढावामुळे दिवाळे निघाल्याचे पोलिसांच्या तपासात पंकज मेहाडिया सांगत आहे. पोलिसांचा मात्र यावर विश्वास नाही. मेहाडियाने नातेवाईकांच्या नावावर बेनामी संपत्ती खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे. तो ही बाब नाकारत आहे आणि पैशाच्या तंगीमुळे घर विक्रीला काढल्याचे तो सांगत आहे.