अरुण गवळीच्या सुश्रुषेत गुंतले कारागृह प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 10:41 AM2021-02-16T10:41:21+5:302021-02-16T10:41:44+5:30
Nagpur News अंडासेलमध्ये डांबण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी सध्या कमालीचा मजबूर झाला आहे. कोरोनाने त्याच्याभोवती घट्ट विळखा घातल्याने डॉन कमालीच्या हतबलपणे दिवस काढत आहे.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नुसते नाव काढले तरी दरदरून घाम फुटावा असा प्रचंड दरारा निर्माण करणारा आणि नंतर हत्येच्या आरोपात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने अंडासेलमध्ये डांबण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी सध्या कमालीचा मजबूर झाला आहे. कोरोनाने त्याच्याभोवती घट्ट विळखा घातल्याने डॉन कमालीच्या हतबलपणे दिवस काढत आहे. त्याला काही होऊ नये म्हणून कारागृह प्रशासन त्याच्या सुश्रुषेत गुंतले आहे.
कोरोना प्रादुर्भावाचे लक्षण दिसल्यामुळे डॉनसह अन्य चार जणांची ९ फेब्रुवारीला तपासणी करण्यात आली. त्यात पाचही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल १० फेब्रुवारीला आला. ११ला त्यांची प्रकृती जास्त झाल्याने १२ फेब्रुवारीला ‘डॉन’सह पाच जणांना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत मेडिकलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आले. ट्रॉमा केअरमध्ये डॉक्टरांच्या पथकाने ‘डॉन’सह पाचही जणांच्या विविध वैद्यकीय तपासण्या तसेच रक्ताचे नमुने घेऊन काही तास त्यांना ऑब्जर्वेशनमध्ये ठेवले. सर्वांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल ९९-९८ आणि सिटीस्कॅन रिपोर्टही नॉर्मल आल्याने त्यांना आवश्यक औषधे तसेच खाण्यापिण्यासंबंधीचे मार्गदर्शन करून डॉक्टरांनी त्यांना कारागृहात रवाना केले. तेव्हापासून अंडासेलमध्ये राहणारा डॉन गेल्या कारागृहाच्या इस्पितळात उपचार घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉन कोरोनामुळे पुरता हतबल झाला आहे. तेथील वैद्यकीय पथक त्याला भल्या सकाळपासून रात्रीपर्यंत डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या आहारानुसार काढा, दूध, शिरा अन् वेगवेगळा आहार तसेच औषधे देत आहे. कोणतीही कुरबुर न करता लहानग्या मुलासारखा डॉन डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानुसार वागत आहे. कधी काळी मनात येईल, ते झटक्यात मागून घेणारा आणि मोठमोठ्या गुंडांसोबत सुरक्षा यंत्रणांचीही भंबेरी उडविणारा डॉन कमालीचा हतबल झाल्याचे संबंधित सूत्र सांगतात.
नातेवाइकांना भेट नाकारली, फोनवरच बोलणी
डॉनला कोरोना झाल्याचे वृत्त ऐकून त्याच्या नातेवाईक आणि दगडी चाळीलाही धक्का बसला आहे. शनिवारी, रविवारी डॉनच्या मुलासह अनेकांनी नागपुरात धाव घेतली. त्यांनी कारागृह प्रशासनाकडे डॉनच्या मुलाखती (भेटी)ची मागणी केली. मात्र, कारागृह प्रशासनाने ती फेटाळून लावली. मानवी दृष्टिकोन लक्षात घेत डॉनसोबत फोनवर बोलणी करून देण्यात आली. डॉनच नव्हे तर नक्षल समर्थक असल्याच्या आरोपात कारागृहात असलेला प्रो. साईबाबा तसेच अन्य आठ कोरोनाबाधितांनाही त्यांच्या नातेवाइकांसोबत दोन दिवसांत फोनवरून बोलणी करून देण्यात आली आहे.
---