१५६ वर्षे जुने नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 08:55 PM2019-05-17T20:55:21+5:302019-05-17T20:59:00+5:30
१८ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून साजरा करतात. संग्रहालय दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे समाजात संग्रहालयाचे महत्त्व अधोरेखित करणे, इतिहासाची आवड निर्माण करणे, प्रेक्षकांना संग्रहालयात येण्याकरिता प्रोत्साहित करणे, संग्रहालयाबद्दल जागरूकता घडवून आणणे इत्यादी आहे. सन १९७७ पासून आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आयोजित करीत आहे. सन २०१९ च्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने मध्यवर्ती संग्रहालय नागपूरवर टाकलेला दृष्टिक्षेप.
भारतात ज्या संंग्रहालयाच्या स्थापनेला १५० पेक्षा जास्त वर्षे पूर्ण केली आहेत, अशा मोठ्या १० संग्रहालयात ‘मध्यवर्ती संग्रहालय’ नागपूरचा चौथा क्रमांक लागतो. हे संग्रहालय २०१९ मध्ये १५६ वर्षे पूर्ण करीत आहे. या संग्रहालयाची स्थापना सन १८६३ रोजी झाली होती व हे महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय आहे.
महाराष्ट्रात सुमारे ७० ते ७५ संग्रहालये आहेत. त्यापैकी १३ संग्रहालये ही महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालये यांच्या अधिपत्याखाली आहेत. या सर्व संग्रहालयामध्ये ‘मध्यवर्ती संग्रहालय’ नागपूर हे सर्वात जुने संंग्रहालय आहे. या संग्रहालयाच्या स्थापनेची पहिली बैठक २७ ऑक्टोबर १८६२ साली झाली. या संग्रहालयाच्या इमारतीचा नकाशा कॅप्टन कोब यांनी तयार केला. तत्कालीन नगरपालिकेने या संग्रहालयाच्या इमारतीकरिता आर्थिक तरतूद केली. सर रिचर्ड टेम्पल हे नागपूर प्रांताचे आयुक्त असताना सन १८६३ मध्ये संग्रहालयाची स्थापना झाली.
सन १८६३ पासून आजपर्यंतच्या दीडशेपेक्षा अधिक वर्षांच्या कार्यकाळात मध्यवर्ती संग्रहालयात अनेक बदल झाल्याचे दिसून येते. भारतातील जुन्या संग्रहालयापैकी एक असल्याने या संग्रहालयात विविध प्रकारचे पुरावशेष, शिल्पे, चित्रे, स्टफ प्राणी इत्यादी संग्रहित आहेत व त्यांच्या आधारावरच संग्रहालयाच्या विविध दालनाची रचना करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मध्यवर्ती संग्रहालयात निसर्ग विज्ञान, पाषाणशिल्प, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती इत्यादी दालनात संबंधित विषयाच्या वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत.
वर्तमान स्थितीत संग्रहालयात विभिन्न विषयांची १० दालने आहेत
पक्षी विभाग: या विभागात निरनिराळ्या प्रकारचे पक्षी प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यापैकी काही पक्षी निसर्गात ज्या परिस्थितीत राहातात, तसे डायोरोमाच्या सहाय्याने प्रदर्शित केले आहेत. या पक्ष्यांमध्ये करकोचा, क्रौंच, माळढोक, जांभूह बगळा, गिधाड, गरुड, बहिरी ससाणा, नीळकंठ, सुतार पिंगळा, घुुबड, कोतवाल, सारस, बदक, पाणकावळा, चमचा, मैना, चिमणी, कावळा प्रदर्शनात आहेत. यासोबतच आशिया, युरोप आणि अमेरिकेतील काही पक्षी आहेत. हे पक्षी कॅप्टन बकमफिल्ड यांनी १८७३ साली संग्रहालयात दिलेत.
प्राकृतिक इतिहास दालन: प्राकृतिक इतिहास दालनात भूगर्भीय प्रारूपातील खनिजे, जीवाष्मे, हाडे व इतर निसर्ग इतिहासाशी संबंधित वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. दालनात सर्वात महत्त्वाचे पुरावे म्हणजे ‘जॉयनोसोरस सेटटेनरी ओनलीस’ या विशाल डायनासोराच्या हाडाच्या अवयवाची प्रतिकृती होय.डायनासोरचा शोध ब्रिटिश काळात चार्ल्स अल्फेड मेटली यांनी लावला. डायनासोरची हाडे मध्य प्रदेशाच्या जबलपूरच्या बडा-छोटा शिमला परिसरातून सन १९१७ ते १९१९ व सन १९३३-१९३७ मध्ये गोळा केली. या डायनासोरचे मूळ अवशेष आजही प्राकृतिक इतिहास दालन, लंडन येथे प्रदर्शित आहेत तर त्यांच्या काही प्रतिकृती या दालनात प्रदर्शनार्थ ठेवलेल्या आहेत.
प्राणी-पक्षी व सरिसृप दालन : संग्रहालयाच्या या दालनात सस्तन प्राणी-पक्षी, जलजीव व सरीसृप याप्रमाणे दोन दालनांचा समावेश आहे. सस्तन प्राणी दालनात मांसाहारी व शाकाहारी प्रकारातील विविध वन्यप्राण्यांचे आकर्षक प्रदर्शन डायरोमा सिनेरीमध्ये केले आहे. यात निरनिराळ्या प्राण्यांचा समावेश आहे. वाघ, गवा, बिबट्या, कोल्हा, वानर, हरीण, जंगली कुत्रा वगैरे प्राणी अतिशय आकर्षकरीतीने त्यांच्या वातावरणात डायरोमा पद्धतीने व कल्पकतेने प्रदर्शित आहेत. याच ठिकाणी प्लाटीपस हा अतिशय दुर्मिळ व भारतात न आढळणारा प्राणी प्रदर्शित करण्यात आला आहे. प्लाटीपस हा अतिशय दुर्मिळ सस्तन प्राणी असून, त्याची उत्पत्ती सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी झाली असल्याची नोंद आहे. सरीसृप व सस्तन प्राण्यांच्या उत्पतीच्या काळातील एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही त्याच्या उल्लेख करता येईल. यांचा समावेश होत असला तरी हा प्राणी अंडी देतो. पण आपल्या पिल्लांचे दूध पाजून पालन करतो. याचे बारकाईने निरीक्षण केल्यास उद्बिल, बदक व कोंबड्या वगैरे प्राण्यांच्या मिश्रणातून बनला असावा, असा संशय येतो.
शस्त्र दालन: ऐतिहासिक काळात युध्दात वापर होणाऱ्या विविध शस्त्र प्रकारातील हत्यारे या दालनांत प्रदर्शित केले आहेत, यामध्ये मुघल, मराठा, शीख, ब्रिटिश व आदिवासी काळातील शस्त्रे प्रदर्शित केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने तलवार, कट्यार, भाला, बंदुका, तोफा खंबर, रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, ढाल, चिलखत, शिरस्त्राण इत्यादी प्रमुख आहे.
शिल्पकला दालन: हे या संग्रहालयाचे पुरातत्त्वीय महत्त्वाचे दालन आहे. या दालनात प्राचीन काळ (इसवी सन पाहिले-दुसरे) शतक ते इसवी सनाच्या १७ व्या शतकापर्यंतचे शिल्प प्रदर्शित करण्यात आले आहेत. या दालनात गांधारकालीन शिल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कुषाण काळात या कलेचा भारतात विशेष प्रभाव व प्रसार दिसून येतो. वाकाटकांनी विदर्भासह मध्य भारतात इ.स. २५० ते इ.स. ५०० पर्यत राज्य केले. वाकाटक राजे कलेचे भोक्ते होते त्यांनी विपुल प्रमाणात शिल्पकलेला प्रेरणा दिली. वाकाटकांची ठराविक शिल्पे या दालनात प्रदर्शित केली आहे. मध्य प्रदेश व अत्यंत अलंकृत व सुंदर १२ व्या शतकातील शिल्पे याच दालनात प्रदर्शित आहेत. नागपुरातील गोंड व भोसले काळातील शिल्पे देखील येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
पुरातत्त्व दालन:मानवी विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्राचीन दगडी हत्यारे, ताब्यांची व लोखंडी हत्यारे पुरातत्त्व दालनात प्रदर्शित केली आहे. यामधील प्रागैतिहास काळातील दगडाची हत्यारे महत्त्वपूर्ण आहेत. दगडी हत्यारांवरून मानवाने आपली प्रगती कशी साधली याचे ज्ञान मिळते. तसेच भारतीय इतिहास तीन हजार वर्षे मागे नेणाऱ्या सिंधू संस्कृतीच्या हडप्पा व मोहोंजोदारो येथील उत्खननातून प्राप्त पुरावशेष येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी मानव किती प्रगत होता याची प्रचिती या पुरावशेषांद्वारे होते. त्याचप्रकारे पुरातत्त्व विभागाव्दारे प्राचीन विदर्भाची राजधानी कौडिंण्यपुर येथे केलेल्या उत्खननाचे अवशेष, कलाकुसरीच्या वस्तू, आभुषणे इ. प्रदर्शित केली आहेत. सोबतच दुर्मिळ पोथ्या व प्राचीन राजवंशाच्या राजाज्ञा, दान उल्लेख असलेले ताम्रपट प्राचीन विदर्भातील व भारतातील नाणी प्रदर्शित केले आहे. नगरधन उत्खननातून प्राप्त वस्तू, माहुरझरी, येथील दगडी मनके व व प्राचीन नाणी इत्यादी प्रदर्शित केली आहेत.
हस्तकला दालन:संंग्रहालयातील सेंट्रल हॉलमध्ये हस्तकला दालनाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये पितळी धातूच्या विविधोपयोगी वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हस्तीदंताच्या मूर्ती या आहेत. या मूर्तीमधील कलाकुसर व सौंदर्य पाहण्याजोगे आहे. चिनी मातीचे भांडी ज्यामध्ये भारतीय व विदेशी भांड्यांचा समावेश आहे. सोप स्टोनच्या दगडी प्रतिमा देखील महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे लाकडी वस्तू, सोन्याचा मुलामा दिलेल्या अलंकृत दागदागिने, वस्त्रे इत्यादी आहेत.
चित्रकला दालन: मध्यवर्ती संग्रहालय हे विदर्भातील चित्रकलेचे प्रदर्शन असणारे एकमेव संग्रहालय आहे. या चित्रकला दालनाची मांडणी, प्रकाश व्यवस्था व डिस्प्ले आधुनिक पध्दतीने केले आहे. संग्रहालयातील या चित्रकला दालनात रझा, डिखोळे, गायतोंडे, बाबुराव पेंटर, दीनानाथ दलाल यांचे चित्रे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. संग्रहालयातील चित्रामध्ये निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, अमूर्त चित्रे, लघु चित्रे, समूह चित्रे, व ऐतिहासिक चित्रे इत्यादी प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मुंबई, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणच्या दृष्यकला परंपरेचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या चित्रांमध्ये वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रे, पुनरुत्थानवादी शैैलीतील चित्रे , प्रसंगचित्रे , आधुनिक कला प्रवाहातील सृजनात्मक रचनाचित्रे अशा नानाविध प्रकारांचा समावेश आहे.
नागपूर वारसा दालन: मध्यवर्ती संग्रहालयातील हेरिटेज (वारसा) दालनाचा उद्देश नागपूरकरांना आपल्या जिल्ह्यातील विविध वारसा स्थळाचे महत्त्व सांगणे हा आहे. आपला वारसा आपण विविध पद्धतीने विषद करू शकतो. यामध्ये गतवैभवाची साक्ष पटवून देण्यात प्राचीन व ऐतिहासिक स्मारके महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याच वारशाचे महत्त्व नागपूरकर जनतेला पटवून देण्याकरिता व इतिहासातील महत्त्वाची घटकांची साक्ष असलेल्या स्मारकाचे छायाचित्रांच्या साहाय्याने प्रदर्शन या दालनात मांडण्यात आले आहे. या दालनात प्राचीन काळापासून जसे महापाषाण युगापासून (आजपासून ३००० ते २५०० वर्षे जुने) ते ब्रिटिश काळात निर्मित स्थापत्याचे ठळक नमुने दाखविण्यात आले आहे. यामध्ये प्राचीन काळातील शवाधान, गुफा-लेणी, मंदिरे, किल्ले, प्रवेशद्वारे, भोसले-गोंड काळातील नागपूरचे स्थापत्य व सर्वात महत्त्वाचे नागपुरातील ब्रिटिश काळात निर्मित इमारतीचा समावेश आहे.
आदिवासी दालन: आदिवासींची संख्या मध्यप्रांतात प्रामुख्याने दिसून येते. विदर्भातही गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यामध्ये आदिवासी विपुल प्रमाणात राहत असून त्यांचे सण, परंपरा, रूढी, चालिरीती, सामाजिक व धार्मिक पध्दतीचे अवलोकन आधुनिक काळात अतिशय महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्र व मध्यप्रदेशतील गोंड, माडिया, कोरकु, बंजारा इत्यादी प्रमुख आदिवारी लोकांच्या दैनिक वापरातील वस्तू, नृत्य व वादनाच्या वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. त्या पाहून गतकालीन समाजाच्या एकंदर परिस्थितीवर विपुल प्रकाश पडतो.
शिलालेख दालन:संग्रहालयाच्या या मुख्य दालनाव्यतिरीक्त गॅलरीमध्ये प्राचीन ते मध्ययुगीन काळापर्यतचे अनेक शिलालेख प्रदर्शित केले आहे. या शिलालेखात मोर्यकालीन ब्राह्मी लिपीतील अभिलेखाव्यतिरीक्त वाकाटक, चालुक्य, परमार, सुल्तान वंश, गुलाम वंश इत्यादी राज्यकर्त्याचे अभिलेख प्रदर्शित केले आहेत. तसेच संग्रहालयाच्या मागच्या मोकळ्या जागेत विविध शिल्पे ज्यांत व्हिक्टोरिया राणीचे भव्य पुतळे प्रमुख आकर्षण आहेत. याशिवाय विदर्भातील महापाषाणयुगीन संंस्कृतीच्या शवाधानातून प्राप्त दगडाची शवपेटी तिचा काळ आजपासून तीन हजार वर्षे आहे. प्रदर्शित केले आहे.
- डॉ. विराग सोनटक्के
अभिरक्षक
मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर