नागपुरातील केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळा झाली ‘पेपरलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:08 AM2018-02-23T10:08:29+5:302018-02-23T10:12:38+5:30

अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर ‘केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळे’ला नवे रूपच दिले, सोबत या योजनेला ‘पेपरलेस’ही केले.

Central pathology Laboratory of Nagpur now 'Paperless' | नागपुरातील केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळा झाली ‘पेपरलेस’

नागपुरातील केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळा झाली ‘पेपरलेस’

Next
ठळक मुद्देनागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा उपक्रम संगणकावर येणार चाचण्यांचे अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय शास्त्रात उपचाराची पहिली पायरी म्हणजे रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान. त्यामुळेच रुग्णालयांतील पॅथालॉजी प्रयोगशाळा (लॅब) महत्त्वाची ठरते. परंतु मेडिकलमध्ये रक्त, मल, मूत्राची चाचणी करण्यापासून ते त्याचा अहवाल येईपर्यंत दुसऱ्या दिवसांची प्रतीक्षा करावी लागायची. यातच चाचणीच्या अहवालातील त्रुटी, तो अहवाल मिळविण्यासाठी रुग्णांना माराव्या लागणाऱ्या चकरांमुळे गोंधळाचे वातावरण झाले होते. याची दखल घेत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर ‘केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळे’ला नवे रूपच दिले, सोबत या योजनेला ‘पेपरलेस’ही केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) चार वर्षांपूर्वी केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळेला सुरुवात झाली. परंतु त्यात नियोजन नव्हते. याचा फायदा रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला होत नव्हता. रुग्णांना साध्या चाचणीसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागायचे. त्याचदिवशी अहवाल मिळण्याची हमीही मिळायची नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत लागून अहवाल मिळवावा लागायचा तर काहींना या अहवालासाठी चकरा माराव्या लागायच्या. धक्कादायक म्हणजे, अहवालातील चुका वाढल्या होत्या. काही डॉक्टर गरज नसताना चाचण्या लिहून देऊन पॅथालॉजीचे काम वाढवायचे. याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेऊन केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळेचे स्वरूपच बदलण्याच्या प्रयत्नाना सुरुवात केली. पॅथालॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री या ‘लॅब’च्या तंत्रज्ञांना केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळेच्याखाली आणले. यामुळे अर्ध्या तासात सामान्य चाचण्यांचे अहवाल उपलब्ध होण्याची शक्यता वाढली. दुसरे म्हणजे, रुग्णांना नोंदणी करण्यापासून ते नमुना देण्यापर्यंत वेगवेगळ्या रांगेतून जावे लागायचे त्यांच्यासाठी आता एकच खिडकी केली.
या खिडकीवर नोंदणीपासून ते नमुने घेण्याची सोय करण्यात आली. विशेष म्हणजे, केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळेला ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टीम’शी जोडण्यात आले. यामुळे डॉक्टरांना आता रुग्णाला कागदावर चाचणी लिहून न देता संगणकावर चाचणी लिहून द्यायची आहे. रुग्ण प्रयोगशाळेत गेल्यास त्याला केवळ नोंदणी कार्ड दाखवायचे आहे. या कार्डवरील नंबर संगणकात टाकताच त्या रुग्णाची संपूर्ण माहिती समोर येऊन पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल. चाचणीचा अहवाल डॉक्टरांना त्यांच्या संगणकावर दिसेल.

नव्या चाचण्यांचीही भर पडणार
केंद्रीय मध्यवर्ती प्रयोगशाळा ‘पेपरलेस’ केल्याने रुग्णच नव्हे तर रुग्णालय प्रशासनासाठी सोईचे ठरले आहे. तूर्तास याची सुरुवात बाह्यरुग्ण विभागापासून करण्यात आली असलीतरी लवकरच आंतर रुग्णांचाही यात समावेश करण्यात येईल. विशेष म्हणजे, ज्या चाचण्या आतापर्यंत मेडिकलमध्ये होत नव्हत्या त्यांचाही यात समावेश करण्याचा प्रयत्न असणार आहे.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे
अधिष्ठाता, मेडिकल.

Web Title: Central pathology Laboratory of Nagpur now 'Paperless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.