केंद्राध्यक्ष शिक्षक अन् मुख्याध्यापक लावणार शाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:07 AM2021-07-08T04:07:39+5:302021-07-08T04:07:39+5:30
- निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाने गोंधळ सावनेर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलसाठी तर पंचायत समितीच्या तीन गणांसाठी पोटनिवडणूक होत ...
- निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाने गोंधळ
सावनेर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन सर्कलसाठी तर पंचायत समितीच्या तीन गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी तहसील कार्यालयाकडून मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशात शिक्षकांना केंद्राध्यक्ष, तर काही मुख्याध्यापकांना त्यांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. एरवी शाळेत हाताखाली काम करणारे शिक्षक (गुरुजी) निवडणुकीत केंद्राध्यक्ष झाल्याने मुख्याध्यापकांत नाराजी आहे.
जिल्ह्यात १९ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या १६, तर आणि पंचायत समितीच्या ३१ गणांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर तालुक्यातील शाळेतील शिक्षकांसह मुख्याध्यापकांचीसुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी आदेशात शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांच्या मदतीसाठी मुख्याध्यापकांना सहायक म्हणून नियुक्त केले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचे काम करायचे का, असा प्रश्न त्यांच्याकडून केला जात आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देत निवडणूक कामासाठी मुख्याध्यापकांची योग्य पदी नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.