मध्य रेल्वेचा प्रवाशांसाठी ‘मिशन संजीवनी’ उपक्रम
By नरेश डोंगरे | Published: June 29, 2024 09:36 PM2024-06-29T21:36:46+5:302024-06-29T21:37:08+5:30
आजारी, अस्वस्थ प्रवाशांना मिळणार तात्काळ आरोग्य सेवा : धावत्या गाडीत फोनवर उपचाराचा सल्ला
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वेस्थानकावर किंवा धावत्या रेल्वेगाडीत अचानक तुमची किंवा तुमच्या नातेवाइकाची अथवा सहप्रवाशाची प्रकृती बिघडली, तर डोन्ट वरी! तुम्हाला ते कळवायचे आहे. संबंधितांना लगेच उपचाराचा सल्ला आणि काही वेळेतच प्रत्यक्ष औषधोपचार उपलब्ध करून दिला जाणार आहे. मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात प्रवाशांसाठी ‘मिशन संजीवनी’ ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
प्रवासादरम्यान रेल्वेगाडीत आपली किंवा दुसऱ्या कुणाची प्रकृती बिघडली, तर व्यक्ती घाबरून जाते. अशा वेळी काय करावे, ते सुचेनासे होते. मात्र, मिशन संजीवनीमुळे संबंधित प्रवाशाला नेमका काय त्रास आहे आणि अशा वेळी कोणते प्रथमोपचार केले पाहिजेत, त्यासंबंधाने तज्ज्ञ डॉक्टर सल्ला देणार आहेत. एखाद्या प्रवाशाला तातडीच्या उपचाराची गरज असेल, तर जवळच्या स्थानकावर त्याला लगेच औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्ये रेल्वे कर्मचारी, तसेच वैद्यकीय अधिकारी समन्वय ठेवणार आहेत. सध्या ही सेवा नागपूर स्थानकावरून सुरू करण्यात आली असून, लवकरच ती विभागातील अन्य काही रेल्वेस्थानकांवरही सुरू करण्यात येणार आहे.
डायल १३९
प्रवासाला निघालेल्या कुण्या प्रवाशाची रेल्वेस्थानकावर प्रकृती खराब झाली, तर त्याला तात्काळ मिशन संजीवनीचा लाभ मिळणार आहे. धावत्या रेल्वेगाडीत आधी उपचाराचा सल्ला आणि नंतर लगेच उपचार मिळेल. रेल्वेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याशी त्यासाठी संपर्क करावा लागणार आहे. रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइनवर फोन केला तरी ही सेवा तात्काळ उपलब्ध करून दिली जाणार असल्याचा दावा, रेल्वे प्रशासनाने केला आहे.