मध्य रेल्वेने फुकट्यांसह बेशिस्त प्रवाशांकडून वसुल केले दीडशे कोटी
By नरेश डोंगरे | Published: September 26, 2022 08:51 PM2022-09-26T20:51:05+5:302022-09-26T20:51:53+5:30
विशेष तपासणी मोहिमेतून दणका - राज्यात नागपूर विभाग तिसऱ्या स्थानी
नागपूर - मध्य रेल्वेने राज्यातील सहा विभागात तिकिट तपासणीची विशेष मोहिम राबवून एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत तब्बल दीडशे कोटी रुपये वसूल केले. फुकट्या आणि बेशिस्त प्रवाशांकडून दंडापोटी ही रक्कम वसूल करण्यात आली. ज्यात मुंबई विभाग पहिल्या तर नागपूर तिसऱ्या स्थानी आहे.
देशभरात विविध मार्गावर रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यात फुकट्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय असते. त्या मागोमाग बेशिस्त प्रवाशांचा नंबर लागतो. जनरल तिकिट घेऊन कुणी आरक्षीत तर कुणी एसीमध्ये प्रवास करतात. अशा प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेकडून जागोजागी विशेष आकस्मिक तिकिट तपासणी मोहिम राबविली जाते. मध्य रेल्वेत मुख्यालय तसेच मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे या विभागाचा समावेश आहे.
या सर्व विभागात १ एप्रिल ते २० सप्टेंबरपर्यंत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विशेष तिकिट तपासणी मोहिम राबविली. या मोहिमेत सहाही विभागात एकूण २३ लाख, २० हजार प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांच्या हाती लागले. त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने दंडापोटी १५४ कोटी, ५७ लाख रुपये वसूल केले.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत मध्य रेल्वेने अशाच प्रकारे मोहिम राबवून ६५ कोटी, ५० लाख रुपये वसूल केले होते. तो आकडा लक्षात घेता यंदा वसूल केलेली रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत १३६ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी १० लाख, ६५ हजार फुकटे प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांच्या हाती लागले होते. तर यंदा या सहा महिन्यात २० लाख, ९७ हजार प्रवासी विनातिकिट आढळले.
विभागनिहाय प्रकरणे - वसुल केलेली रक्कम
- मुंबई विभाग - ९.०१ लाख, ५१.१३ कोटी
- भुसावळ विभाग - ४.८९ लाख, ३८.५८ कोटी
- नागपूर विभाग - ३.३४ लाख, २२.३६ कोटी
- सोलापूर विभाग - २.७२ लाख, १७.५९ कोटी
- पुणे विभाग - १.६२ लाख ११.२७ कोटी
- मुख्यालय १.६१ लाख, १३.६४ कोटी