मध्य रेल्वेकडून विनातिकिट प्रवासी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका

By नरेश डोंगरे | Published: May 9, 2024 02:17 PM2024-05-09T14:17:44+5:302024-05-09T14:18:45+5:30

सात विक्रेत्यांना अटक : ९२६ विनातिकिट प्रवाशांवर दंडाची कारवाई

Central Railway takes action against ticketless passengers, unauthorized hawkers | मध्य रेल्वेकडून विनातिकिट प्रवासी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका

Central Railway takes action against ticketless passengers, unauthorized hawkers

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विनातिकिट प्रवासी आणि अनधिकृत फेरीवाले, विक्रेते यांच्याविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या ४८ तासांत ९२६ विनातिकिट प्रवासी आणि ७ अनधिकृत विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

अनधिकृत खान-पान विक्रेत्यांनी रेल्वे प्रवाशांच्या जिवितांशी खेळ चालविला आहे. कारवाईचा अधिकार असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याची संधी साधून ही मंडळी वेगवेगळ्या स्थानकावर, रेल्वे गाड्यांमध्ये चढून शिळे तसेच दर्जाहिन खाद्य पदार्थ, शित पेये, फळे, चहा, कॉफी, आईसक्रीम आणि पाण्याच्या बाटल्या विकत आहे. प्रवाशांच्या आरोग्यांशी सुरू असलेला हा खेळ अनेक महिन्यांपासून सर्वत्र बिनबोभाट सुरू आहे. अशात आता रेल्वेच्या बल्लारशाह आणि नागपुरातील स्टॉलवरून अंडा बिर्याणी प्रवाशांना विकण्यात आली आणि ती खाल्ल्यामुळे अनेकांना विषबाधा झाल्याने अवघे रेल्वे प्रशासन हादरले आहे. या पार्श्वभूमीवर, विभागीय रेल्वे वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी खाद्य पदार्थ, पेये, पाणी, फळे विकणारांना चांगलेच फैलावर घेतले असून, त्यांनी दर्जेदार खाद्य पदार्थ, पेये तसेच फळे विकण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये विकले जाणारे खाद्य पदार्थ स्वच्छ तसेच दर्जेदार आहेत की नाही, याची नियमित तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी अनधिकृत विक्रेते तसेच फेरीवाल्यांवर कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी रात्री दुरंतो एक्सप्रेसमध्ये बोगस ओळखपत्र घेऊन खाद्यपदार्थ विकणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आली. वर्धा स्थानकावरही काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तर, मंगळवारी, बुधवारी नागपूर स्थानकावर सात अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४, १४७ अंतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली.

येथे राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणी मोहिमेत ९२६ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करून ५ लाख, ४२ हजार, ६८५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कारवाई अशीच सुरु राहणार
प्रवाशांना चांगल्या प्रकारची खापनपान सेवा देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळे यापुढे कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. विनातिकिट प्रवासी आणि अनधिकृत खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध यापुढे अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली आहे.
 

Web Title: Central Railway takes action against ticketless passengers, unauthorized hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.