मध्य रेल्वेच्या पंधरवड्यातून स्वच्छतेचा जागर, प्रवाशांशी व्यक्तिगत संवाद
By नरेश डोंगरे | Published: September 22, 2023 04:02 PM2023-09-22T16:02:27+5:302023-09-22T16:03:11+5:30
पथनाट्यातून समुपदेशन
नागपूर : मध्य रेल्वेच्या स्वच्छता पंधरवड्यातून रेल्वे प्रवाशांसोबत संवाद तसेच पथनाट्य आदीतून स्वच्छतेचा जागर केला जात आहे.
प्रवासाला जाता - येताना प्रवाशांना सर्वत्र साफसफाई दिसावी आणि प्रवासात प्रसन्नतेची अनुभूती मिळावी यासाठी मध्य रेल्वे तर्फे दरवर्षी 'स्वच्छता पंधरवडा' साजरा केला जातो. यंदा १६ सप्टेंबरपासून हा पंधरवडा सुरू झाला असून तो २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या निमित्ताने मध्य रेल्वेच्या सर्व विभागांनी रेल्वे स्थानकांच्या सर्व मुख्य भागांच्या स्वच्छतेच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.
नागपूर विभागातील सर्व स्थानकांवर स्वच्छता अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे वापरण्याची आणि स्वच्छता करताना वैयक्तिक स्वच्छता राखण्याच्या आवश्यकतेबद्दल सल्ला देण्यात आला आहे. प्लॅस्टिक बॉटल क्रशिंग मशिनचा योग्य वापर लोकांना दाखवून देण्यात येत आहे. यंत्रसामग्री आणि उच्च दाबाच्या पाण्याच्या जेटचा योग्य वापर करून ट्रॅक स्वच्छ करण्यात आले आहे.
स्टेशन परिसरात पंखे, केबल्स आणि इतर उपकरणांची स्वच्छता राखण्यात यावी, रेल्वे स्थानकांची स्वच्छता आणि देखभाल आणि डबे, रिटायरिंग रूम, वेटिंग रूम, वसतिगृहे नीटनेटके आणि स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व आणि पद्धती याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी चर्चासत्र आणि समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवाशांसोबत व्यक्तीगत संवाद साधून आणि पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून प्रवाशांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले जात आहे.