नागपुरातील मध्यवर्ती सीताबर्डी भाग लहान मुलांसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:57 AM2018-09-14T10:57:29+5:302018-09-14T10:59:20+5:30
सीताबर्डी परिसराची ओळख ही शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून आहे. मात्र पोलीस विभागातील नोंदीनुसार हा परिसर लहान मुलांसाठी धोकादायक ठरतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी परिसराची ओळख ही शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून आहे. मात्र पोलीस विभागातील नोंदीनुसार हा परिसर लहान मुलांसाठी धोकादायक ठरतो आहे. २०१५ पासून साडेतीन वर्षांत सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ लहान मुलांचे विविध हल्ल्यांमध्ये बळी गेले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांकडे विचारणा केली होती. २०१५ पासून धंतोली, अंबाझरी व सीताबर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत किती गुन्हे झाले, त्यात हत्या-महिलांवरील अत्याचार तसेच लहान मुलांवरील हल्ले व बळी इत्यादींचे प्रमाण किती होते, याबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते.
प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत लहान मुलांवरील हल्ल्याचे २४ गुन्हे दाखल झाले वयात २४ मुले किंवा मुली यांचा बळी गेला.
२०१५ व २०१६ या दोन्ही वर्षात प्रत्येकी नऊ बळी गेले. तर २०१८ मधील पहिल्या सहा महिन्यांतच तीन मुलांना जीव गमवावा लागला. याच कालावधीत तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत थोडेथोडके नव्हे तर ५४ ज्येष्ठ नागरिक विविध घटनांमध्ये बळी पडले. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३४ तर अंबाझरीत १८ जणांचा जीव गेला.
लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे बळी नेमके कुठल्या कारणामुळे गेले हे पोलीस विभागाने स्पष्ट केले नसले तरी ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.
महिला अत्याचाराची ३९ प्रकरणे
सीताबर्डी, धंतोली व अंबाझरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पांढरपेशा वस्तीचे प्रमाण मोठे आहे. मात्र असे असतानादेखील साडेतीन वर्षांत या परिसरात महिला अत्याचाराची ३९ प्रकरणे नोंदविण्यात आली. तर या कालावधीत येथे २२ हत्या झाल्या. ‘चेनस्नॅचिंग’चे प्रकारदेखील येथे दिसून आले. १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत ‘चेनस्नॅचिंग’चे ७७ गुन्हे नोंदविण्यात आले.