केंद्रीय पथक २४ ला नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:28+5:302020-12-17T04:36:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक दोन महिन्यानंतर नागपुरात येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक दोन महिन्यानंतर नागपुरात येत आहे. येत्या २४ तारखेला हे पथक येणार असून नागपूरसह गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्याचीही पाहणी करतील.
ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारच्या आदेशावरून नुकसान पंचनामे करण्यात आले. यात लाखो हेक्टर शेतपीक उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले. राज्य सरकारने पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली. परंतु हा निधी तोकडा असल्याची टीका झाली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत देण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडून केंद्र सरकारला दिला. मुख्यमत्री, मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाने अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु केंद्राकडून पथक पाठविण्यात आला नसल्याचा आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यानंतर आता केंद्राकडून नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पथक पाठविण्यात येणार आहे. २४ डिसेंबरला पथक येणार असून नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करतील. पथकाची दोन गटात विभागणी होणार असून, यातील एक गट २४ ला नागपूर व २५ ला भंडारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. तर दुसऱ्या गटातील अधिकारी २४ ला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची पाहणी करतील.