केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी मोबाईलच्या प्रकाशात केली शेतीच्या नुकसानीची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 12:50 AM2019-11-26T00:50:09+5:302019-11-26T00:50:40+5:30
परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या धान व कपाशीसह इतर पिकांना अक्षरश: लोळविले. शेतकरी हवालदिल झाला. मदतीसाठी टाहो फोडला. मात्र मदत मिळाली नाही.
- शरद मिरे
भिवापूर - परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या धान व कपाशीसह इतर पिकांना अक्षरश: लोळविले. शेतकरी हवालदिल झाला. मदतीसाठी टाहो फोडला. मात्र मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतक-यांनी नुकसानग्रस्त शेतपिकांची आवरासावर (कापणी) केली. आता शेतातील पिके दिसेनासे झाल्यानंतर केंद्र सरकारचे विशेष पथक सोमवारी नुकसानीची पाहणी करण्याकरिता तालुक्यात दाखल झाले. अंधारात शेतक-यांच्या बांधावर पोहोचलेल्या या पथकाने मोबाईलच्या टॉर्चमध्ये शेतातील नुकसानीची पाहणी केली. त्यामुळे मोबाईलच्या प्रकाशात या अधिका-यांना नुकसान दिसले कसे, हा प्रश्नच आहे.
कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक आर.पी. सिंग यांच्या मुख्य उपस्थितीत हे पथक सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भिवापूर येथे दाखल झाले. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण दिवस सोडून सूर्यास्तानंतर आलेल्या या पथकाला भिवापुरातच अंधाराने घेरले. अंधारातच या पथकाने नक्षी शिवारातील ऋषीकेश लोहकरे यांचे शेत गाठले. अन् कशी-बशी नुकसानीची पाहणी केली. यावेळी सायंकाळचे ६.३० वाजल्यामुळे पूर्णत: अंधार पडला होता. दरम्यान शेतातील नुकसान, नुकसानग्रस्त शेतकरी आणि पथकातील अधिका-यांचे चेहरेसुद्धा एकमेकांना दिसत नव्हते. त्यामुळे मोबाईलच्या टॉर्चमध्ये नुकसानीची पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम या पथकाने उरकला. धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर यातून कपाशीचे पीक सुटणार असा प्रश्न कदाचित या पथकाला पडला असावा त्यामुळे लगतच्याच प्रवीण गजभिये या शेतक ºयाच्या कपाशीच्या शेतात पाय ठेवत पथकाने पाहणी केली. अंधारामुळे रस्ता कुठे आणि शेत कुठे? खड्यात पाय ठेवत, या पथकाने नुकसानीचा पाहणी कार्यक्रम अर्ध्या तासात उरकला. दाटलेल्या अंधारात या अधिका-यांना खरंच नुकसान दिसले काय? की निवळ कागदपत्र रंगविण्याचे सोपस्कार पार पाडल्या गेले, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
या दौ-यात उपविभागीय अधिकारी हिरामण झिरवाळ, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी पी.एम. डाखळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, सहायक गट विकास अधिकारी रोषनकुमार दुबे, कृषी अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह नगराध्यक्ष किरण नागरीकर, नंदा नारनवरे, बाळू इंगोले, राहुल गुप्ता, संदीप निंबार्ते, विजय वराडे, विठ्ठल राऊत, तुळशीदास चुटे, राजू गारघाटे, रमेश भजभुजे, वसंता ढोणे, कवडू नागरीकर, दिलीप गुप्ता, चंदू पारवे, विकास जवादे, राकेश धोटे, युवराज करणुके, आनंद पुनवटकर, उमेश ढोरे, भक्तदास चुटे, बंडू ढाकुनकर आदी उपस्थित होते.