केंद्रीय पथक घेणार आज कोरोनाचा मृत्युदराचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:08 AM2021-02-08T04:08:46+5:302021-02-08T04:08:46+5:30
नागपूर : राज्यात कोरोनाचा मृत्यूदर २.५२ टक्के असताना नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर ३.०८ टक्क्यांवर गेला आहे. शिवाय, दिवसाला २५० ते ...
नागपूर : राज्यात कोरोनाचा मृत्यूदर २.५२ टक्के असताना नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर ३.०८ टक्क्यांवर गेला आहे. शिवाय, दिवसाला २५० ते ३५० दरम्यान बाधितांची भर पडत आहे. या मागील कारणे जाणून घेण्यासाठी सोमवारी केंद्रीय आरोग्य विभागाचा तीन सदस्यीय पथकाकडून तपासणी होणार आहे. रविवारी हे पथक अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात होते.
प्राप्त माहितीनुसार, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स कार्यक्रमाचे संचालक डॉ. सुजित कुमार सिंग, उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी व डॉ. रणजित कौशिक ही त्रिसदस्यीय चमू सोमवारी नागपूरच्या उपसंचालक आरोग्य विभागाचा कार्यालयात कोरोना संबंधित आरोग्य यंत्रणाचा आढावा घेणार आहे. तेथून हे पथक इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कोविड हॉस्पिटलची पाहणी करून तज्ज्ञाशी चर्चा करण्याची शक्यता आहे. केंद्रीय पथक येणार असल्याचा माहितीची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी दुजोरा दिला आहे. सूत्रानुसार, या पथकाने रविवारी अमरावतीमध्ये घेतलेल्या बैठकीत रुग्णांच्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांवर बोट ठेवल्याची माहिती आहे.