रेड झोन जिल्ह्यातील पाचवीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 10:17 AM2020-04-16T10:17:20+5:302020-04-16T10:17:49+5:30
सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालक चिंता व्यक्त करीत आहे. अनुदानित शाळांमधील ५ ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्र्यांना केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्यातील सर्व शाळा १५ मार्चपासून बंद आहेत. सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालक चिंता व्यक्त करीत आहे. अनुदानित शाळांमधील ५ ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्र्यांना केली आहे.
सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता, त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चौथ्या वर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्गात दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. शाळा थेट पुढील शैक्षणिक सत्रातच सुरू होणार हे उपसचिव शालेय शिक्षण यांच्या पत्राने निश्चित झाले आहे. त्यामुळे चौथीतून पाचव्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात अकरावी व आरटीईचे प्रवेश ऑनलाईन करण्यात येतात. याच धर्तीवर पाचव्या वर्गाचेही प्रवेश करण्यात यावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी केली आहे. निदान रेड झोन जिल्ह्यात तरी पाचवीची प्रवेश प्रक्रिया प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन पद्धतीने अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेच्या धर्तीवर राबविल्यास पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही व शालेय प्रशासनालाही सोयीचे होईल. रेड झोन जिल्ह्यात अनुदानित शाळेत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया तात्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.