सीईओंची विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश
By गणेश हुड | Published: July 11, 2023 07:03 PM2023-07-11T19:03:25+5:302023-07-11T19:03:46+5:30
Nagpur News विभागप्रमुखच आदेशाचे पालन करीत नसल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी बदली झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी दिली आहे.
गणेश हूड
नागपूर : मे महिन्यात जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया पार पडली. सर्व विभागातील १५८ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांना ३१ मे पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू व्हायचे होते. मात्र विभागप्रमुखांनी आपल्या मर्जीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. विभागप्रमुखच आदेशाचे पालन करीत नसल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी बदली झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी दिली आहे.
जिल्हा परिषदेतील १५८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती करण्यात आल्या. यात आरोग्य विभागातील ४१, शिक्षण १५, सामान्य प्रशासन विभाग ४०, वित्त ३, लघुपाटबंधारे २, ग्रामीण पाणीपुरवठा २, बांधकाम -६, पशसंवर्धन ८, महिला व बाल कल्याण ६, कृषि २ आणि पंचायत विभागातील ३३ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शर्मा यांच्या आदेशाने विभाग प्रमुखांत खळबळ उडाली आहे.,