सोहळा कृतज्ञतेचा, गौरव माजी महापौरांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:10 AM2021-03-04T04:10:17+5:302021-03-04T04:10:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १९५१ ते आजवर नागपूरने ५३ महापौर पाहिले. सर्वांनीच नेतृत्व करताना शहर विकासाला प्राधान्य दिले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९५१ ते आजवर नागपूरने ५३ महापौर पाहिले. सर्वांनीच नेतृत्व करताना शहर विकासाला प्राधान्य दिले. अनेक योजना आल्या, अंमलबाजवणी केली.
ज्यांच्यामुळे नागपूरच्या विकासाचा आलेख वाढला. शहराचे रुपडे पालटले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होता मनपाचा स्थापना दिन. हे औचित्य साधून सर्व महापौरांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्यासाठी त्यांना सहृदय सन्मानित करावे, ही भावना प्रत्यक्षात साकारत शहराचे ५४ वे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी नागपूर महापालिकेचे महापौरपद भूषविलेल्या व हयात असलेल्या महापौरांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांना सन्मानित केले.
माजी महापौर सरदार अटलबहादूरसिंग यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे, अटलबहादूरसिंग यांचा जन्मदिवसही होता. त्यानंतर शहराच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, माजी महापौर राजेश तांबे, माजी महापौर मायाताई इवनाते, वसुंधरा मसूरकर, नंदा जिचकार, डॉ. कल्पना पांडे, पुष्पाताई घोडे, माजी महापौर व विद्यमान आ. विकास ठाकरे, अनिल सोले, नरेश गावंडे, पांडुरंग हिवरकर, किशोर डोरले या सर्व मान्यवरांची भेट घेऊन महापौरांनी मनपाचा मानाचा दुपट्टा व सन्मानचिन्ह देऊन सर्वांचा सत्कार केला. उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे यांच्यासह संबंधित झोनचे सभापती उपस्थित होते.
विकासात माजी महापौरांचे योगदान
नागपूर शहराचा जो विकास झाला आहे. त्यामध्ये शहराचे महापौरपद भूषविलेल्या सर्वाचे योगदान आहे. प्रत्येकाने आपली भूमिका, संकल्पना मांडल्या व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही केले. त्याचेच परिणाम आज शहरात वाचनालय, उद्यान, रस्ते, पथदिवे व इतर अन्य सुविधा दिसत आहेत. सर्वांच्या संकल्पना वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागे शहराचा विकास व्हावा, हीच भावना होती, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.