लेखन अस्सल तर प्रतिसाद नक्कीच

By Admin | Published: March 20, 2016 02:55 AM2016-03-20T02:55:21+5:302016-03-20T02:55:21+5:30

सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी आणि जाहिरातींसाठी लिहिले तर भरपूर पैसा मिळतो. पण हे लेखन टिकत नाही. ते तुम्हाला समोर नेत नाही.

Certainly the genuinely responsive writing | लेखन अस्सल तर प्रतिसाद नक्कीच

लेखन अस्सल तर प्रतिसाद नक्कीच

googlenewsNext

विश्वास पाटील : तिसऱ्या रसिकराज संमेलनाचे उद्घाटन
नागपूर : सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी आणि जाहिरातींसाठी लिहिले तर भरपूर पैसा मिळतो. पण हे लेखन टिकत नाही. ते तुम्हाला समोर नेत नाही. आपले साहित्य टिकावे आणि पुढच्या पिढीपर्यत जावे, असे वाटत असेल तर त्यासाठी कळा सोसाव्या लागतात. आपले अनुभवांचे संचित समृद्ध असेल तर चांगले लेखन येते. ठरवून केलेल्या लिखाणाला फारसा अर्थ नसतो. लेखन अस्सल असेल तर रसिक, वाचकांकडून चांगला प्रतिसादही मिळतो आणि त्याचे समाधानही मोठे असते, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.
रसिकराज सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था आणि कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा यांच्यातर्फे गोविंदराव वंजारी यांच्या स्मृतीला अर्पण तिसरे राज्यस्तरीय रसिकराज मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कामगार कल्याण भवन, रघुजीनगर येथे आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाला कादंबरीकार रवींद्र शोभणे, लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले, पहिल्या रसिकराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर मोगलेवार, प्रमुख कार्यवाह डॉ. बळवंत भोयर, कवी ज्ञानेश वाकुडकर, मेजर हेमंत जकाते आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाटील म्हणाले, खासगी वाहिन्यांच्या मालिकांसाठी लेखन करणाऱ्यांना एका मालिकेच्या लेखनासाठी बक्कळ पैसा मिळतो. पण हे लिखाण टिकत नाही. यातून रसिक समृद्ध होत नाही. एखादी कादंबरी लिहिण्यासाठी पाच-पाच वर्षांचा वेळ जातो. अक्षर वाङ्मय आणि अस्सल लेखन करायचे असेल त्याच्या कळा सोसाव्या लागतात. एका दिवसात असा पराक्रम करता येत नाही. त्याची साधना असतेच. नव्या लेखकांनी अशी कळ सोसण्याची तयारी ठेवायला हवी, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मनात मातीचा पोत आणि बीज फुलत असते तसेच लेखकाच्या मनातही कथाबीज फुलत असते. माणसांचे जगणे, प्रश्न, संघर्ष आणि वेदना लेखकही टिपत असतो. हे ज्याला टिपता येते तो चांगला लेखक होऊ शकतो. आपल्या लिखाणातील सत्त्व आणि तत्त्व जपले तर साहित्यनिर्मिती होते. मराठीत इतके प्रचंड लेखन होत असताना मराठी कधीच मरणपंथाला लागणार नाही. मराठी ही १० कोटी जनतेची भाषा आहे ती कधीही संपूच शकत नाही.
आपली भाषा अत्यंत लवचिक आणि समृद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

प्रवाही भाषेसाठी लेखकांनी प्रयत्न करावे
खासगी वाहिन्यांवर मराठी दाखविण्यात येणारे कार्यक्रम जगभरातील १५० ते २०० देशांत प्रसारित केले जातात. त्यामुळे जेथे मराठी माणूस तेथपर्यंत मराठी पोहोचते. पण आपली भाषा समृद्ध करण्यासाठी त्यात अधिकाधिक अनुभव आले पाहिजेत. भाषा सोपी आणि साधी करण्याचाही प्रयत्न लेखकांनी करायला हवा. सामान्य माणसांना कळेल अशी भाषा असली तर तिचा विकास होतो. मराठी हेच आपले संचित आहे, ती आपली संस्कृती आहे, ती कधीही संपू शकत नाही, असा विश्वास यावेळी विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. डॉ. जोग म्हणाले, महाराष्ट्राला मिळालेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांना साहित्याची जाण आहे. तशी परंपराच या राज्याला लाभली आहे. साहित्यिकांची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून प्रत्येक शासनाने प्रयत्न केले आहेत. पण लेखनात कुणी जातीयवादाचे विष पेरू नये आणि ते निर्माणही करू नये. साहित्यातून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी प्रतिमा इंगोले यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांचा आणि नागपूरचा संबंध सांगितला. त्यांनी या संमेलनाला शुभेच्छा देतानाच आयोजक बळवंत भोयर यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविकातून या संमेलनाची भूमिका डॉ. बळवंत भोयर यांनी सांगितली. संचालन शुभांगी रायलू यांनी केले. आभार भा. म. कुऱ्हाडे यांनी मानले. याप्रसंगी वर्षा किडे-कुळकर्णी यांच्या ‘वेध अंतरंगाचे आणि चेरीचे विश्व’, चित्रा कहाते यांच्या ‘स्मृतिबंध’ या कवितासंग्रहाचे मनोहर महल्ले यांच्या ‘रणरागिणी तसेच नाती आणि माती’, संजय येरणे यांच्या समीक्षा संग्रह आणि प्रतिमा इंगोले यांच्या ‘हॅट्ट्रिक’ या पुस्तकाचे अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाच्या अक्षरलेणी या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.

Web Title: Certainly the genuinely responsive writing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.