गर्भनिरोधक गोळ्यांच्या अधिक वापरांमुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:08 AM2021-09-25T04:08:05+5:302021-09-25T04:08:05+5:30
-स्त्री कर्करोग जनजागृती महिना नागपूर : महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर गर्भाशय मुखाचा (सर्वायकल कॅन्सर) कर्करोग सर्वाधिक आढळून येत आहे. या ...
-स्त्री कर्करोग जनजागृती महिना
नागपूर : महिलांमध्ये स्तन कर्करोगानंतर गर्भाशय मुखाचा (सर्वायकल कॅन्सर) कर्करोग सर्वाधिक आढळून येत आहे. या कर्करोगासाठी ९० टक्के ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (एचपीव्ही) कारणीभूत ठरत असला तरी गर्भनिरोधक गोळ्यांच्या अधिक वापरांमुळेसुद्धा या कर्करोगाचा धोका तीन ते चार पटीने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गर्भाशय मुख कर्करोगास कारणीभूत ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ हा असुरक्षित लैंगिक संबंधांद्वारे पसरतो. त्याचे १५० प्रकार असून, त्यापैकी १५ प्रकारचे विषाणू कर्करोगास कारणीभूत ठरतात. त्यापैकीही ७० टक्के कर्करोग हे टाईप १६, १८, ३१ विषाणूंद्वारे होत असल्याचे आढळले आहे. याशिवाय धूम्रपान, दीर्घकाळापर्यंत गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन, अधिक मुलांना जन्म देणे, कमी वयात लैंगिक संबंध व लग्न या सामाजिक बाबीदेखील कारणीभूत ठरतात; मात्र लसीकरण, सुरक्षित लैंगिक संबंध आणि योग्य वेळी केलेल्या तपासणीमुळे त्यावर पूर्णत: प्रतिबंध करता येत असल्याचे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. नितीन बोमनवार यांचे म्हणणे आहे.
-गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर वाढला
मूल जन्माला घालण्यापूर्वी शंभर टक्के आर्थिक सुरक्षेचे विचार, दोन्ही पालक वर्किंगचे वाढते प्रमाण परिणामी, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर वाढला आहे; परंतु ५ ते ९ वर्षे गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका सामान्यापेक्षा तीन पटीने तर १० वर्षाहून अधिक वापर केला तर चार पटीने वाढतो. याशिवाय परिवारात कुणाला कर्करोग झाला असल्यासदेखील कर्करोगाची जोखिम वाढते.
-कर्करोगावर लसीकरण प्रभावी
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी आहे. ही ‘एचपीव्ही’ लस ९ ते २६ वयोगटात दिल्या जाते. पहिल्या लैंगिक संबंधांपूर्वी लस घेतली पाहिजे. याशिवाय एकाहून जास्त जोडीदारांशी लैंगिक संबंध टाळावा. लैंगिक संबंध हा सुरक्षित असावा, त्यासाठी निरोध वापरणे हितावह ठरते.
-दर पाच वर्षांनी चाचणी आवश्यक
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जोखिम असेल तर ‘पॅप स्मीर’ ही चाचणी करून कर्करोगपूर्व बदल तपासता येतात. वयाच्या पंचविशीनंतर ही चाचणी करता येते. सामान्यत: हा कर्करोग टाळण्यासाठी दर पाच वर्षातून एकदा ही चाचणी करायला हवी.
-गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळता येतो
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा मुख्यत्वे करून ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’द्वारे पसरतो. त्यामुळे योग्य प्रतिबंधात्मक काळजी घेतली तर, त्यास टाळता येणे शक्य आहे. लसीकरण, सुरक्षित लैंगिक संबंध व योग्य वेळेत तपासणी ही कर्करोग टाळण्याची त्रिसूत्री आहे.
-डॉ. नितीन बोमनवार, कर्करोग शल्यचिकित्सक.