महिला अधिकाऱ्याच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली सीजीएसटी विभागाचे मुख्य प्रधान आयुक्त अशोक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 10:51 PM2022-05-17T22:51:35+5:302022-05-17T22:53:37+5:30
Nagpur News केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणजेच सीजीएसटी विभाग, नागपूर येथे मुख्य प्रधान आयुक्त पदावर कार्यरत असलेले अशोक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर : केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणजेच सीजीएसटी विभाग, नागपूर येथे मुख्य प्रधान आयुक्त पदावर कार्यरत असलेले अशोक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागातील महिला अधिकाऱ्याने अशोक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. अशोक यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यात संपणार होता, हे विशेष.
प्राप्त माहितीनुसार, अशोक यांची सीजीएसटी विभागात कार्यरत एका महिला अधिकाऱ्यासोबत असभ्य वर्तन आणि लैंगिक शोषण केल्याची तक्रार करण्यात आली होती. संबंधित महिलेने अशोक यांच्याविरुद्ध विभागीय बोर्डामार्फत केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत अर्थमंत्रालयाने मुख्य प्रधान आयुक्त अशोक यांना निलंबित केले आहे. निलंबनाची कारवाई शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी करण्यात आल्याची माहिती आहे.
शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस कार्यालयाला सुटी असल्यामुळे अशोक यांच्या निलंबनाचे वृत्त बाहेर आले नाही. पण मंगळवारी सकाळी कार्यालयाचे कामकाज सुरू होताच कार्यालयात त्यांच्या निलंबनाचे वृत्त चर्चेचा विषय होता. अशोक हे १८ ऑगस्ट २०२१ रोजी बेंगळुरू येथून नागपूर विभागात पदोन्नतीवर रुजू झाले होते आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये ते निवृत्त होणार होते. पण त्याआधीचे त्यांचे निलंबन झाले आहे. या कारवाईमुळे नागपूर सीजीएसटी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.