विद्यार्थ्यांच्या पूरक साहित्यात ‘चाचा चौधरी आणि मोदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 08:54 PM2018-07-24T20:54:07+5:302018-07-24T20:58:17+5:30

चाचा चौधरी लहान मुलांसाठी लोकप्रिय कॉमिक्स आहे. या कॉमिक्सचा आधार घेत राज्यकर्त्यांनी शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटण्यात येणाऱ्या पूरक साहित्यात ‘चाचा चौधरी आणि मोदी’ ‘विकासपुरुष मा. नरेंद्र मोदी’ ही पुस्तके वाटली आहे. राज्यकर्त्यांचा शिक्षण क्षेत्रात वाढलेला धुडगूस यामुळे शिक्षण क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे.

'Chacha Chaudhary and Modi' in supplementary text book | विद्यार्थ्यांच्या पूरक साहित्यात ‘चाचा चौधरी आणि मोदी’

विद्यार्थ्यांच्या पूरक साहित्यात ‘चाचा चौधरी आणि मोदी’

Next
ठळक मुद्देसर्व शिक्षा अभियानातून शाळांमध्ये वाटली पुस्तके : शिक्षण क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चाचा चौधरी लहान मुलांसाठी लोकप्रिय कॉमिक्स आहे. या कॉमिक्सचा आधार घेत राज्यकर्त्यांनी शासकीय योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटण्यात येणाऱ्या पूरक साहित्यात ‘चाचा चौधरी आणि मोदी’ ‘विकासपुरुष मा. नरेंद्र मोदी’ ही पुस्तके वाटली आहे. राज्यकर्त्यांचा शिक्षण क्षेत्रात वाढलेला धुडगूस यामुळे शिक्षण क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे.
दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कलचाचणी रिपोर्ट कार्डवर मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्याचा फोटो, पाठ्यपुस्तकातून भाजपाचा राजकीय संदेश दिल्यानंतर आता सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी ‘चाचा चौधरी आणि मोदी’, ‘विकासपुरुष मा. नरेंद्र मोदी’ हे पुस्तक वाटण्यात आली आहे. ‘चाचा चौधरी आणि मोदी’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आणि शेवटच्या पानावर मोदींचे मोठे छायाचित्र असून पुस्तकांमध्ये मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती सांगण्यात आली आहे. तसेच, शासकीय योजना रंजक पद्धतीने सांगण्यात आल्या आहे. यामध्ये उघड्यावर शौच करू नये, परिसर स्वच्छ ठेवा, घरात शौचालये बनवा, स्वच्छता अभियान आदी माहिती सांगितली आहे. पुस्तकात प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर पोहोचविण्याची उज्ज्वला योजना, मुलींच्या शिक्षणासाठी मुली वाचवा, मुली शिकवा, नोटबंदीद्वारे काळा पैसा आणि गुन्हेगारी घडामोडींवर प्रतिबंध, डिजिटल इंडिया, वस्तू व सेवा कर (जीएसटी) अशा योजनांची माहिती दिली आहे. या पुस्तकामध्ये चाचा चौधरींचे छायाचित्र लहान, तर मोदींचे छायाचित्र मोठे छापले असून विद्यार्थ्यांचे लक्ष छापील मजकूरांपेक्षा मोदींवर कसे जाईल, याची पुरेपुर काळजी घेतल्याचे ठळकपणे दिसून येत असल्याबद्दल शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे ही पुस्तके सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहेत. पहिली ते पाचवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी ही पुस्तके देण्यात आली आहे. ही पुस्तके शाळेच्या वाचनालयामध्ये ठेवायची आहे.
 विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी संत, महात्मा, थोर पुरुष यांची पुस्तके दिली जावीत. त्यातून मूल्य रुजतील, संस्कार होईल, अशी अपेक्षा आहे. अलिकडच्या काळात राज्यकर्त्यांनी आपला भविष्यातील मतदारावर डोळा ठेवून, भविष्यात आपला राजकीय फायदा कसा होईल, विद्यार्थ्यांच्या घरात पक्षाचा अजेंडा कसा पोहचेल, असे प्रकार चालविले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने थांबले पाहिजे.
पुरुषोत्तम पंचभाई, शिक्षणतज्ञ
 शासनाच्या योजना समाजासाठी असतात. विद्यार्थ्यांना त्या कळाव्यात यासाठी मुलांच्या आवडीचे कॅरेक्टरची जोड देऊन ते रंजक पद्धतीने मुलांना उपलब्ध केली आहे. यातून सरकारचा कुठलाही राजकीय अजेंडा दिसत नाही. राजकीय हेतू असता तर त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निवडले असते. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेले हे कार्य आहे, यात राजकारण आणणे चुकीचे आहे.
राजश्री उखरे, शिक्षणतज्ञ
 हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांना टार्गेट करून एकप्रकारे जाहिरात करण्याचा प्रकार आहे. हे विद्यार्थी मतदार नसले तरी, शिक्षकांच्या माध्यमातून आपली धोरणं विद्यार्थ्यांवर बिंबविली जात आहे. हा प्रकार म्हणजे सत्तेची मनमानी करणे आहे.
प्रज्ञा बडवाईक, शिक्षणतज्ज्ञ

 

Web Title: 'Chacha Chaudhary and Modi' in supplementary text book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.