चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर लावला छडा; सराफा व्यावसायिकासह सात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 10:25 PM2021-12-24T22:25:28+5:302021-12-24T22:27:03+5:30
Nagpur News दाभा आणि बेलतरोडीत दरोेडे घालून पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर छडा लावला.
नागपूर - दाभा आणि बेलतरोडीत दरोेडे घालून पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या चड्डीबनियान टोळीचा पोलिसांनी अखेर छडा लावला. हे दरोडे आंतरराज्यीय दरोडेखोर चंगीराम देसाईच्या टोळीने घातले होते. त्याच्या मुलासह चार दरोडेखोर आणि त्यांना मदत करणाऱ्या सराफा व्यावसायिकांसह सात जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज पत्रकारांना दिली.
२९ नोव्हेंबर, ३ डिसेंबर आणि १० डिसेंबरला अनुक्रमे दाभ्यातील सागर खरचे, अनिता मेश्राम आणि बेलतरोडीतील मंगेश देवराव वांद्रे यांच्याकडे दरोडे पडल्याने पोलिसांची झोपमोड झाली होती. सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी शोध सुरू केला असता दरोडेखोर रामझुला, संविधान चाैकाजवळच्या फुटपाथवर राहात असल्याचे तसेच तेथेच त्यांनी हिस्सेवाटप केल्याचे दिसले. येथे चंगिराम अनेक दिवस वास्तव्याला होता असेही सीसीटीव्हीत दिसले. त्या आधारे पोलिसांनी आधी मध्यप्रदेश आणि नंतर उत्तरप्रदेशात छापेमारी केली.
अलाहाबाद गुन्हे शाखेच्या मदतीने तेथील पारधी बेड्यावर छापा मारून तेथे गुरू उर्फ आकाश उर्फ गुज्जर उर्फ मोंग्या चंगिराम गोसाई (वय २१, रा.गुलगाव सांची, जि.रायसेन मध्यप्रदेश), निर्मल रोशनलाल मोंग्या (वय २०, रा. माणिकपूर , जि.रायसेन), रोहित भगत उर्फ रामदास भगत (वय २४, रा.चित्रकुट, उत्तरप्रदेश), पिंट्या बब्बू मोग्या (वय १९, रा. धामरमुडा, जि. विदिशा, मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून सोन्याची विल्हेवाट लावणारा सराफा व्यापारी प्रवीण कानोले (रा. गोधनी), त्याचा नोकर संदेश रोकडे तसेच बोलेरोचालक हरी श्रीराम आसोले (रा. कपिलनगर) यांना अटक केली. या टोळीविरुद्ध विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
आठ मोबाईल, बोलेरो जप्त
पोलिसांनी या टोळीकडून ८ मोबाईल तसेच बोलेरो पिकअप व्हॅन जप्त केली. सूत्रधार चंगिराम आणि त्याचे साथीदार फरार आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहायक निरीक्षक मयूर चाैरसिया, गणेश पवार, उपनिरीक्षक बलराम झाडोकर, लक्ष्मीछाया तांबुसकर तसेच कर्मचारी संतोष मदनकर, रेनॉल्ड अन्थोनी, राजेश तिवारी, आशिष ठाकरे, प्रवीण रोडे, प्रशांत कोडापे, नरेंद्र ठाकरे, सागर ठाकरे, कुणाल मसराम, सुधीर पवार, विद्याधर नागदेवते, सुनील कुवर आणि योगेश गुप्ता यांनी ही कामगिरी बजावली.
----