गोळीबार प्रकरणात चाैघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:13 AM2021-08-14T04:13:00+5:302021-08-14T04:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सोमवारी भल्या सकाळी प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडावर गोळीबार करून खळबळ उडवून देणाऱ्या कुख्यात मुसा ऊर्फ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सोमवारी भल्या सकाळी प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडावर गोळीबार करून खळबळ उडवून देणाऱ्या कुख्यात मुसा ऊर्फ मुस्फिक खान मोहम्मद शकिल याच्यासह चाैघांना तहसील पोलिसांनी अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मुसा, कामरान नकीब ऊर्फ कम्मू अशपाक अहमद, सय्यद इमरान ऊर्फ इम्मू सय्यद जिमल आणि अल्ताफ मिर्झा इकबाल बेग मिर्झा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चाैघेही सराईत गुन्हेगार असून, आरोपी मुसासोबत मोहसिन अहमद मुस्ताक अहमद (वय ३५) याचा गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. मोहसिनसुद्धा गुन्हेगार आहे. वर्चस्वाच्या लढाईत त्यांचे एकमेकांच्या साथीदारांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरूच असतात. गेल्या आठवड्यात त्यांचे शत्रूत्व टोकाला पोहचल्याने मुसाने मोहसिनची फिल्डिंग लावली होती. त्याचा गेम करण्यासाठी सोमवारी पहाटे ४.४५ वाजता मुसाने आपल्या साथीदारांसह गीतांजली चाैकात मोहसिनवर गोळी झाडली. ती त्याच्या उजव्या पायाच्या मांडीतून आरपार गेली. त्यामुळे तो खाली पडला. त्याला गोळी लागल्याचे लक्षात येताच, आरोपी मुसा, कम्मू, ईम्मू, अल्ताफ आणि जावेद त्यांच्या कारने पळून गेले. दरम्यान, मोहसिनला पायाला गोळी लागल्याने तो बचावला. तहसील पोलिसांना त्याने आरोपींची नावे सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे जाऊन पोलिसांनी आरोपी मुसा, कम्मू आणि ईम्मूच्या मुसक्या बांधल्या. त्यांचा आज पीसीआर संपला. तर, रात्री अल्ताफला अटक करण्यात आली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. जावेद फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---
सीसीटीव्हीतून मिळाला धागा
पहाटेच्या वेळी झालेल्या या गोळीबाराने पोलिसांची झोप उडविली होती. आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागातील ४० ते ५० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यातून धागे जोडत पोलिसांनी छिंदवाडा गाठले अन् पाचपैकी चार आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी आणि सहायक आयुक्त संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलचे ठाणेदार जयेश भांडारकर, सहायक निरीक्षक संदीप बागुल, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, संजय दुबे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
----