नागपुरात सलून कारागिरांच्या मागण्यांसाठी साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:53 PM2020-06-12T21:53:25+5:302020-06-12T23:20:38+5:30
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नागपूर जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी रेशीमबाग चौकातील वीर भाई अण्णासाहेब कोतवाल यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नागपूर जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी रेशीमबाग चौकातील वीर भाई अण्णासाहेब कोतवाल यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले.
सकाळी ११ वाजता जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर आणि जिल्हा युवा अध्यक्ष अमोल तलखंडे यांनी माल्यार्पण करून बैठे साखळी उपोषणाला सुरुवात केली. प्रदेश कार्यकारिणीच्या कोर कमिटीच्या परवानगीनंतर हे उपोषण करण्यात आले. सरकारने सलून व्यावसायिकांच्या समस्या ओळखून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी किंवा तातडीने आर्थिक पॅकेज जाहीर करून मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
प्रदेश उपाध्यक्ष विजय वाटकर, प्रदेश कार्यकारी चिटणीस डॉ. संतोष मैदानकार, सरचिटणीस प्रवीण चौधरी व जिल्हा उपाध्यक्ष तानाजी कडवे यांच्या नेतृत्वात शांततेने बेमुदत साखळी उपोषण पार पडले. गोपाल कडुकर, मामा राऊत, स्वतंत्र विदर्भ राज्य आघाडीचे बदुकले, धोबी समाज बहुउद्देशीय संस्थानचे मनोज कनोजिया, विदर्भ मोलकरीण संघटनेचे सचिव विलास धोंगडे आदींसह अनेकांनी आंदोलनाला भेटी दिल्या. आनंद आंबोलकर, देवा वानखेडे, अमोल ठामके, ओम दवलेकर, सुभाष दहेकर, तुकाराम वाट, गणेश वाटकर आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.