रेल्वे तिकिटांच्या ‘रिझर्वेशनची चेन पुलिंग'; 'मेरा नंबर कब आयेगा' किंवा 'नो टेन्शन'
By नरेश डोंगरे | Published: May 20, 2023 08:20 AM2023-05-20T08:20:00+5:302023-05-20T08:20:02+5:30
Nagpur News उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवासाला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर रिझर्व्हेशन करणे या मोठ्या संकटाला बहुसंख्य नागरिक सामोरे जात असल्याचे दृष्य रेल्वे स्थानकावर पहावयास मिळते.
नरेश डोंगरे
नागपूर : प्रदीर्घ प्रवासामुळे आणि तहान-भुकेमुळे कंटाळलेल्या प्रवाशांना कधी एकदा आपले रेल्वेस्थानक येते, याची प्रतीक्षा असते. अशात ज्या स्थानकावर उतरायचे, ते जवळ आले असताना अचानक कुणी चेनपुलिंग करतो आणि एखाद्या निर्जन भागात रेल्वेगाडी थांबते. अशा वेळी आपल्या नियोजित ठिकाणी उतरण्यासाठी अधीर असलेल्या प्रवाशाची स्थिती काय होत असेल, त्याची कल्पनाच केलेली बरी. तो प्रवासी शांतही राहू शकत नाही अन् कुणावर चिडू, रागावूही शकत नाही. मनातल्या मनात चरफडत तो गाडी सुटण्याची वाट बघत बसतो. अशीच काहीशी अवस्था रेल्वे तिकिटाच्या रिझर्वेशनची आस लावून बसलेल्या हजारो रेल्वे प्रवाशांची रोज होत आहे. काही भ्रष्ट मंडळी मध्येच रेल्वे तिकिटांच्या रिझर्वेशनची चेन पुलिंग करीत आहेत.
अनेक जण उन्हाळ्याच्या सुटीत सहपरिवार पर्यटनाचा बेत आखतात. मुलांच्या शाळा-कॉलेजला सुट्या लागल्या की लगेच इच्छित ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे तिकिटांच्या रिझर्वेशनसाठी धावपळ सुरू होते. मात्र, महिना-दीड महिना आधी रिझर्वेशनसाठी धाव घेऊनही लांबलचक वेटिंग लिस्ट डोळ्यासमोर येते. 'मेरा नंबर कब आयेंगा' या प्रतीक्षेतील अनेक प्रवाशांचा प्रवासाचा दिवस काही तासांवर येऊनही वेटिंग क्लियर होत नाही. त्यामुळे संबंधित प्रवासी हिरमुसले होऊन 'दुसरा पर्याय' शोधण्यासाठी धावपळ करतात.
अन् रिझर्वेशन क्लियर मिळते
रेल्वेच्या संकेतस्थळावर किंवा बुकिंग काउंटरवर जाऊन रिझर्वेशनसाठी महिना-दीड महिन्यापासून प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांपैकी कुणी जर दलालांकडे गेले तर त्यांना हमखास रिझर्वेशन कन्फर्म देण्याची दलाल भाषा वापरतो. नव्हे, तिकिट कन्फर्मसुद्धा करून देतो. त्यासाठी दलालाला एका प्रवाशाच्या एकीकडच्या प्रवासासाठी तीनशे ते सातशे रुपये 'ब्रोकरेज' द्यावे लागते. बस्स... तेवढे मोजले की रिझर्वेशन क्लियर !
काय आहे जादूची कांडी
जेथे ३० ते ४० दिवस होऊनही तिकीट कन्फर्म होत नाही तेथे दलालांमार्फत काढलेले तिकीट काही तासांतच कसे कन्फर्म होते, असा प्रश्न आहे. ब्रोकर काय जादूची कांडी फिरवतो, त्याचा कानोसा घेतला असता रिझर्वेशन प्रक्रियेतील काही भ्रष्ट मंडळींची साखळी समोर येते. ही साखळीच जादूची कांडी फिरवते अन् रखडलेल्या तिकीटचा वेटिंग नंबर समोर ओढण्यास मदत करते. त्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअरचीही मदत घेतली जाते.
छोटी बात, मोठे अर्थकारण
बहुतांश छोट्या-मोठ्या रेल्वेस्थानकावरून तिकीट कोट्याच्या रिझर्वेशनचे चेन पुलिंग होते. संबंधितांपैकी काही भ्रष्ट मंडळीचाही त्यात छोटासा हातभार लावतात अन् रोज हजारो रुपये पदरात पाडून घेतात. त्याचमुळे की काय, कारवाईचा अधिकार असलेली मंडळी या गैरप्रकाराकडे डोळेझाक करते.