नागपूर जिल्ह्यात तलावांतील बदलामुळे होत आहे चेन रिऍक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 10:55 AM2021-03-20T10:55:35+5:302021-03-20T10:56:20+5:30
Nagpur News जेव्हा मोठे तलाव लहान तलावांत परिवर्तित होतात, तेव्हा पाण्यातील जैवविविधतेतील संरचनेत परिवर्तन होत असते. अनेक जीव लुप्त होतात. यामुळे, जीवजंतूंची फूड चेन बाधित होते आणि याची चेन रिऍक्शन पर्यावरणावर दिसून येते.
श्रेयस होले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९६४ मध्ये प्रकाशित नागपूर शताब्दी ग्रंथानुसार शहरात नऊ मोठे तलाव आहेत. यातील सहा मोठ्या तलावांचा कॅचमेंट एरिया नष्टप्राय झाल्याने ते लहान तलावांत परिवर्तित झाले आहेत. या दीर्घकालीन परिवर्तनाचा पर्यावरणावर खोलवर प्रभाव पडणार आहे. यासंदर्भात लोकमतने विशेषज्ञ म्हणून प्रख्यात वैज्ञानिकांशी संपर्क साधला असता, त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपले मत व्यक्त केले. जेव्हा मोठे तलाव लहान तलावांत परिवर्तित होतात, तेव्हा पाण्यातील जैवविविधतेतील संरचनेत परिवर्तन होत असते. अनेक जीव लुप्त होतात. यामुळे, जीवजंतूंची फूड चेन बाधित होते आणि याची चेन रिऍक्शन पर्यावरणावर दिसून येते. त्यामुळे, ग्राउंड वॉटर रिचार्ज पॅटर्नही बदलायला लागते. गेल्या काही वर्षांत नागपूर जिल्ह्याचा भूजलस्तर मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून येते. त्याचे कारणही हेच आहे. तरीदेखील तलावाच्या संवर्धनाबाबत ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाचे उदासीन धोरण आणि कमजोर नियोजन व विकासकार्यांमुळे ही चेन रिऍक्शन अत्यंत वेगाने होत आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करणे ठीक, परंतु कॅचमेण्ट एरियावरील अतिक्रमण दूर करण्यावर भर दिला, तर तलावातील पाणी वर्षभर टिकून राहील, यासाठी वैज्ञानिकांची एक समिती उभारून, पर्यावरणीय प्रभावावर सर्वेक्षण सरकारने करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कॅचमेण्ट एरियावर कचरा आणि घाण
प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कॅचमेण्ट एरिया कमी होत आहे. फुटाळा तलावावरून हे स्पष्ट होते. लोकांकडून तेथे कचरा आणि घाण टाकली जात आहे. तेथे ना सुरक्षारक्षक आहे ना कोणता साइन बोर्ड. पावसात हाच कचरा आणि घाण तलावाच्या काठावर जमा होते. वाडी टोलबुथच्या मागे भिंत बनविण्याची मागणी पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे केली. परंतु, त्यांनीही दुर्लक्ष केले. राज्य सरकारही उदासीन आहे. तलावाच्या कॅचमेण्ट एरियाला संरक्षित वनक्षेत्र घोषित करण्याची गरज आहे.
- श्रीकांत देशपांडे, पर्यावरणप्रेमी
............